पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६३
बहामनी काल
 


मृतावस्था
 या सर्व घडामोडींचा आपल्याला मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या म्हणजेच संस्कृतीच्या दृष्टीने अभ्यास करावयाचा आहे. त्या दृष्टीने पाहू लागताच एक उद्वेगजनक गोष्ट प्रथमच ध्यानात येते. बहामनी सत्ता १४८० नंतर अगदी विकल झाली होती. त्यानंतर तख्तावर आलेले सुलतान अगदी नालायक व दुबळे होते. त्यामुळे सर्वत्र अंदाधुंदी व अराजक माजले होते. मोठमोठया सरदारांचे व प्रसंगी सुलतानांचेही खून पडत होते. दक्षिणी व परदेशी यांच्यांत नित्य रक्तपात चालू होता. यामुळेच वर सांगितलेल्या सुभेदारांना बहामनी सत्तेचे लचके तोडून आपापली स्वतंत्र राज्ये स्थापणे शक्य झाले. पण उद्वेगजनक गोष्ट ही की यातला एकही लचका हिंदूंनी किंवा मराठ्यांनी तोडला नव्हता. या काळात महाराष्ट्रात, राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे, निकम, राणे, शिरके, सावंत, मोरे, भोसले, जाधवराव, काटे, घोरपडे अशी अनेक मराठा घराणी नांदत होती. पण या कोसळत्या सत्तेचा एक लचका आपण तोडावा, आणि जावळी, ठाणे, वाडी, खानदेश इ. ठिकाणी आपापले स्वतंत्र राज्य स्थापावे, अशी बुद्धी किंवा स्फूर्ती एकाही घराण्यातील पुरुषाला झाली नाही, इतके ते मृत झाले होते. आदिलशाही, इमादशाही, इ. पाच शाह्या ज्यांनी स्थापन केल्या ते कोण होते हे पाहिले तर मनाचा उद्वेग दसपटीने वाढतो. बेरीदशाही स्थापन करणारा कासीम बेरीद हा प्रथम महंमद शहापाशी एक गुलाम होता. पण स्वतंत्र राज्य निर्मिण्याचे कर्तृत्व प्रगट करू शकला. विजापूरचा यूसफ आदिलशहा हाही एक तुर्क गुलाम होता. तो इराणातून १४५९ साली दाभोळास आला. आणि त्याची कर्तबगारी अशी की तीस वर्षांच्या अवधीत भारतातला तो एक स्वतंत्र राजा झाला. हा उपरी, आगापिछा नसलेला मनुष्य. पण पिढिजाद खानदानीवर वारसा सांगणाऱ्यांना जे जमले नाही ते त्याने सहज करून दाखविले. कुली कुतुबशहा हाही इराणातून आलेला. तो एका मोठ्या कुळात जन्मला होता. पण येथे आला तो उपरी म्हणूनच. पण तोही राज्यकर्ता होऊ शकला. या तिघांचे चरित्र पाहून स्वजनाकडे पहावे, तो मन उद्विग्न होते. आपला उद्वेग दसपटीने वाढतो, असे वर म्हटले आहे. राहिलेल्या दोघांचे चरित्र पाहिले तर तो शतपट होतो. इमादशाही स्थापन करणारा फतेहल्ला इमादशहा हा मूळचा हिंदू ब्राह्मण होता. विजयनगरबरोबर झालेल्या एका लढाईत तो मुसलमानांच्या कैदेत पडला. नंतर तो मुसलमान झाला. निजामशाही स्थापन करणारा अहंमद निजामशहा हाही एका ब्राह्मणाचा मुलगा. विजयनगरचा एक ब्राह्मण भिमाप्पा बहिरू याचा मुलगा लढाईत कैदी झाला. रीतीप्रमाणे तो मुसलमान झाल्यावर मलिक नाईब निजाम उल्मुल्क झाला. या मूळ ब्राह्मण असलेल्या मलिक नाईबाचा मुलगा अहंमद निजामशाही हे स्वतंत्र राज्य स्थापण्यास, आणि वरील फत्तेउल्ला इमादशहा इमादशाही स्थापण्यास समर्थ होऊ शकला. ब्राह्मण हा ब्राह्मण असताना जे करू शकत नाही, ते