पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 



अस्मितेतून संस्कृती
 मानव हा येथून तेथून सर्व एकच असे नेहमी म्हटले जाते. आणि याच्या उलट प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, तो इतरांहून अनेक दृष्टींनी भिन्न असतो, असेही म्हटले जाते. यात परस्परविसंगती आहे असे बाह्यतः वाटत असले तरी, या दोन्ही विधानांना अर्थ आहे. वर्ग, वंश, धर्म, भूमी, भाषा इत्यादींमुळे मानवामानवांत कितीही भेद निर्माण झाले असले तरी, या कारणांमुळे पृथक झालेल्या मानवसमूहात अनेक समानधर्म असतात. उपजतप्रवृत्ती बहुधा सर्वत्र सारख्या असतात. संघटन- विघटन-प्रवृत्तीही सर्वत्र दिसून येतात. राजशासन, धर्मशासन यांच्या पद्धतीही प्रारंभीच्या काळी बहुतेक मानवसमूहात एकरूपच होत्या, असे इतिहास सांगतो. परमेश्वर, गुरू, मातापिता यांच्याविषयी भक्ती, बंधुभगिनीप्रेम, आतिथ्यशीलता हे सांस्कृतिक गुणही बहुतेक मानवसमूहांत आढळून येतात. हे सर्व ध्यानी घेऊन सर्व मानव एकच आहे असे विधान केले जाते. पण दुसऱ्या दृष्टीने पाहता भिन्न मानवसमूहांत भेदही अनेक दिसतात. आणि त्यांचा मागोवा घेता, एक वंश दुसऱ्यापासून, एक धर्मी दुसऱ्या धर्मीयांपासून, एक भाषिक दुसऱ्या भाषिकांपासून, एक प्रादेशिक समूह दुसऱ्या प्रादेशिकांपासून, एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाहून, इतकेच नव्हे तर, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींपासून अनेक दृष्टींनी अगदी भिन्न आहे, असेही दिसून येते. या भेदामुळेच प्रत्येकाला व्यक्तित्व प्राप्त झालेले असते. हे व्यक्तित्व मनुष्यालाच असते असे नाही. राष्ट्राच्या बाबतीतही तो शब्द योजिला जातो. जर्मनी, फ्रान्स,