पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२३८
 

शांची असावी, असे एकमत आहे. मधले मुख उमेचे असून दुसरी दोन्ही शिवाचीच आहेत, असे दुसरे मत आहे. काही असले तरी जगातील अत्यंत भव्य अशा शिल्पाकृतीत या मूर्तीची गणना केली जाते. कारागिरीच्या कल्पनेची अतिशय उंच भरारी या शिल्पात दिसून येते. इतरही लेणी अशीच सुंदर असून त्यांत प्रचंड स्तंभ व अनेक मूर्ती आहेत. बेटाच्या दक्षिण बाजूला एक दगडी हत्ती होता. त्यावरून या स्थानाला 'एलेफंटा' हे नाव पडले. घारापुरीची लेणी तिसऱ्या ते सातव्या शतकाच्या काळात कोरलेली असावीत.

हेमाडपंती
 हेमाडपंती वास्तुकलेचा विचार करून महाराष्ट्रीय कलेचे हे विवेचन संपवू. रामदेवराव यादवाचा प्रधान हेमाडपंत याने एका विशिष्ट पद्धतीने महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली. म्हणून त्या शिल्पपद्धतीस 'हेमाडपंती' असे नाव पडले. हेमाडपंती मंदिराची रचना चुना किंवा माती न घेता फक्त एकावर एक दगड ठेवून केली जाते. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल त्याच आकाराची पण लहान अशी शिखराची बैठक असते. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून, एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या या इमारतीच्या पायाची आखणीच कोनबद्ध अशी असते. या पायावर उभारलेल्या भिंतींनी जे कोन बनतात त्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून निघून थेट कळसापर्यंत गेलेल्या असतात.

अंबरनाथ
 अकराव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रात अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांमध्ये अंबरनाथ, बलसाणे, महेश्वर, सिन्नर इ. देवालये महत्त्वाची आहेत. त्यांतील अंबरनाथ मंदिर सर्वोत्कृष्ट आहे. तेथे अकराव्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेले शिवमंदिर हेमाडपंती आहे. त्याचे शिल्प अप्रतिम आहे. गाभाऱ्याच्या दरवाज्यावर शिवादी देवता, सिंह, हत्ती इ. आकृती कोरलेल्या आहेत. मंडपात अनेक स्तंभ असून त्यांवर आधारलेले घुमटाकृती छत आहे. मंदिराच्या भिंतीवर एकंदर ७० मूर्ती कोरलेल्या असून काही शिवाच्या तर काही विष्णूच्या अवतारांच्या आहेत. एका बाजूला त्रिभंगी नृत्यमुद्रेत महिषासुरमर्दिनीची मूर्ती व अष्टभुजा कामदेवतेची मूर्ती आहे. उत्तर कोकणातील हे मंदिर अद्वितीय असून शिलाहारांच्या मंदिर शिल्पाचा तो अत्युत्कृष्ट नमुना आहे.
 महाराष्ट्रातील कलावैभवाचे वर्णन येथवर केले. त्यात नृत्य, गायनवादन यांचे तपशीलवार वर्णन आलेले नाही. पण विशिष्ट अशी नृत्यपद्धती निर्माण न झाल्यामुळे असे झाले असावे. पण या मोठ्या कला महाराष्ट्राने जोपासल्या होत्या यात शंकाच नाही. प्रत्येक मंदिरात व लेण्यात नृत्ययुगले, नृत्यमूर्ती दृष्टीस पडतात. परमेश्वराला