पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२३०
 

सूत्रबद्ध प्रकरण न करी तू.'

गुप्त लिपी
 सर्वसामान्य जनांना ब्रह्मविद्येचा लाभ व्हावा म्हणून महानुभावांनी आपले साहित्य मराठीतून लिहिले. पण पुढे याचा त्यांना विसर पडला. पंथस्थापनेनंतर ६०/७० वर्षांनीच आपले सर्व साहित्य अत्यंत गुप्त ठेवावे, अशी बुद्धी त्यांना झाली आणि गुप्त, सांकेतिक अनेक लिपी तयार करून त्यांनी आपले सर्व वाङ्मय त्यात लिहून ठेविले. चक्रधरांच्या मागून पंथात अराजक माजले आणि त्याचे निरनिराळे तेरा पंथ झाले. प्रत्येक जण आपल्या पंथाला सर्वश्रेष्ठ मानू लागला. आणि आपापले ज्ञान गुप्त ठेवण्याच्या हेतूने प्रत्येकाने आपली स्वतंत्र लिपी केली.

प्रभाव ?
 महानुभाव पंथाचा मराठी जनतेवर किती प्रभाव पडला याचा विचार करून हे विवेचन संपवू. पंजाबातमुद्धा या पंथाचा काहीसा प्रसार झाला होता. तेव्हा महाराष्ट्रात त्याच्या दसपट झाला असेल असे मनात येते. पण तसे काही झालेले नाही. या पंथाबाहेर त्यातील थोर पुरुषांचा उल्लेख, मागल्या इतिहासात चुकूनसुद्धा कोणी केलेला आढळत नाही. मानभावी - ढोंगी - असा तिरस्कारवाचक शब्द मात्र त्यांच्याविषयी रूढ झालेला आहे. याचे एक कारण असे दिसते की आपल्या मठाबाहेर पडून समान्य जनांत मिसळून महानुभवांनी कधी कीर्तन प्रवचने केली नाहीत. नामदेव वाळवंटात उभा राहून विठ्ठलाचा गजर करीत असे. त्या कीर्तनाला हजारो लोक जमत. तसा प्रयत्न महानुभावांनी कधी केला, असे इतिहासात आढळत नाही. त्यातून कोणाच्या कधी उपयोगी पडावयाचे नाही, असे त्यांचे व्रत असल्यामुळे लोकांत त्यांच्याविषयी तिरस्कार वाटत असला पाहिजे. आणि शेवटचे कारण म्हणजे गुप्त लिपी. वरील कारणे असूनही त्यांचे ग्रंथ काही प्रमाणात तरी वाचले गेले असते. पण तो मार्ग पूर्ण बंद झाला. त्यामुळे महाराष्ट्र, मराठी भाषा व मराठी सामान्य जन यांवर प्रेम असूनही महानुभाव पंथाचा महाराष्ट्रात प्रसार झाला नाही आणि येथे त्यांचा कसलाही प्रभाव पडला नाही.

क्रांती ?
 चातुर्वर्ण्य, जातिभेद याच्या विरुद्ध महानुभावपंथ होता. ही त्याने मोठीच क्रान्ती केली, असे अर्वाचीन काळचे काही पंडित सांगतात. तशी क्रांती महानुभावांनी केल्याचे मुळीच आढळत नाही. वारकरी पंथात ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीनेच नामदेव व तुकाराम यांचे महत्त्व आहे. पहिले दोघे ब्राह्मण व दुसरे दोघे शूद्र. पण समाज आणि वारकरी त्यांना मुळीच कमी लेखीत नाही. उलट महानुभाव पंथात वर जे