पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९७
समाजरचना
 

होताच. महाभारताअन्वये शूद्र, वैश्य यांना मंत्रिपद व राजपदही वर्ज्य नव्हते. पण स्मृतिकारांनी तशी परवानगी दिलेली आहे. प्रथम आपद्धर्भ म्हणून व पुढे नित्याची. वसिष्ठ स्मृतीने 'आत्मत्राणे वर्णसंकरे वा' आत्मरक्षणासाठी किंवा वर्णसंकर थांबविण्यासाठी ब्राह्मण व वैश्य यांनी शस्त्र घ्यावे असे सांगितले आहे. याज्ञवल्क्य, बृहद्यम, उशनस, देवल इ. स्मृतिकारांनी शूद्राला व्यापार, कारागिरी, उद्योग हे व्यवसाय आपद्धर्म म्हणून नव्हे, तर नित्याचे विहित म्हणून सांगितले आहेत. प्रत्यक्षात शूद्र राजपदीही विराजमान होत हे आपण पाहिलेच आहे.

अन्नव्यवहार
 जे विवाह व व्यवसाय याविषयी तेच धोरण अन्नपानाविषयीही होते. शूद्रांघरी उत्तम पक्काने असली तरी ती द्विजांनी कशी सेवावी, अशी पृच्छा ज्ञानेश्वर करतात. पण पूर्वीच्या काळी असली बंधने नव्हती. मध्ययुगाविषयी लिहिताना कुलगुरू चिंतामणराव वैद्य म्हणतात, 'या कालातील विशेष लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे उच्च जातींत एकत्र होणारा अन्नपानादी व्यवहार ही होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सर्व जातींचे लोक प्रसंगविशेषी एकत्र भोजन करीत. एवढेच काय, तर विशिष्ट शूद्रांसमवेतही भोजन करण्यास त्यांस प्रत्यवाय वाटत नसे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी एकत्र भोजन करू नये, असे निषेधपर स्मृतिवचन सापडत नाही. तर उलट अशा भोजनास संमतिदर्शक अशीच वचने सापडतात. व्यासस्मृतीत असे सांगितले आहे की 'धर्मेण अन्योन्य भोज्यान्नाः द्विजास्तु विदितान्वयाः ।' सर्व द्विजांनी - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी एकत्र भोजन करावे. (मात्र पंक्तीला बसताना सर्व द्विजच आहेत ही खात्री करून घ्यावी.) त्याचप्रमाणे, नापित, गुराखी व आपल्या कुलाचा (शूद्र) मित्र यांच्याशी हे शूद्र असले तरीही अन्नोदक व्यवहार करण्यास हरकत नाही. वसिष्ठ स्मृतीतही असे वचन आढळते अनुलोम विवाहाप्रमाणेच एकत्र भोजनाच्या प्रघाताने समाजात एकजीवपणा व जोम उत्पन्न होई, यात शंका नाही.' (मध्ययुगीन भारत, भाग २, पृ. ३२९ ).

सहभोजन
 डॉ. आळतेकर यांनी या विषयासंबंधी पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे. 'आपस्तंब, बौधायन व इतर धर्मसूत्रकार सर्व जातींच्या सहभोजनास मुक्त अनुज्ञा देतात. पण पुढील स्मृतिकार ते निषिद्ध मानतात. अंगिरसाने ब्राह्मणाला शूद्राशी सहभोजन वर्ज्य केले. क्षत्रियाशी सहभोजनसुद्धा धार्मिक उत्सवप्रसंगी व वैश्याशी आपत्काळी विहित होय. यम आणि व्यास यांनी ब्राह्मणाला फक्त स्वजातीपासून पक्वान्न भिक्षा घेण्यास अनुज्ञा दिली आहे (अंगिरस, यम, व्यास इ. स. ६०० ते ९०० ). अल्बेरूणीने लिहून ठेविले आहे की ब्राह्मण काही दिवस शूद्रान्न घेईल तर तो बहिष्कृत होत असे.