पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५९
धार्मिक जीवन
 

चीन, जपान, सिलोन इ. देशांतही खूप प्रचार झाला होता. महाराष्ट्रात त्याचा खूपच प्रसार झाला असावा असे दिसते. एकंदर भारतात बौद्धांची ९०० लेणी आहेत. त्यांतील ८०० महाराष्ट्रात आहेत आणि ती कोकण, देश, मराठवाडा अशा सर्व विभागांत आहेत. बौद्धातील महायानपंथाचा धुरीण नागार्जुन हा मूळ विदर्भातलाच होय. शिवाय प्रत्यक्ष राजसत्ताधारी घराणी जरी येथे बौद्ध नसली तरी त्यांनी बौद्धांना उदार आश्रय दिला होता हे वर सांगितलेच आहे. यामुळे सरासरी एक हजार वर्षे तरी भारतात व महाराष्ट्रात बौद्धपंथाची चलती होती यात शंका नाही. जैनपंथाचा बौद्धपंथाप्रमाणे जगभर प्रसार झाला नाही. भारतातही त्या प्रमाणात त्याची भरभराट झाली नाही. पण त्याचा बौद्धपंथाप्रमाणेच भारतातून लोपही झाला नाही. त्याला अनुयायी थोडे मिळाले हे खरे. १९२१ साली भारतातील जैनांची संख्या सुमारे १२/१३ लाख होती. तेव्हा मागल्या काळी ती बरीच कमी असली पाहिजे. पण काही राजांचा व धनिक व्यापारी वर्गाचा त्याला मोठा पाठिंबा मिळाल्यामुळे आजही भारतात तो टिकून आहे. तेव्हा आपल्या आरंभीच्या कालखंडात महाराष्ट्रात या दोन पंथांचा कितपत प्रभाव पडला, हे पाहणे आवश्यक आहे.
 हे दोन्ही पंथ मुळात आत्यंतिक निवृत्तिवादी आहेत. ते परमेश्वर मानीत नाहीत. आणि आत्माही मानीत नाहीत. पण जग हे क्षणभंगुर आहे, आणि संसार अत्यंत दुःखमय आहे, हे वेदान्ती मत त्यांना मान्य आहे, त्याचप्रमाणे कर्मवाद व पुनर्जन्म- सिद्धान्त हेही त्यांना मान्य आहेत. संसारातील सर्व दुःखे, तृष्णा, वासना यांमुळे निर्माण होतात व त्यामुळे तृष्णाक्षय हा त्यांच्या मते एकच मुक्तीचा मार्ग आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून, नरकाच्या यातनांतून ज्यांना मुक्त व्हावयाचे असेल त्यांनी सत्य, अहिंसा, अपरिग्रह या तत्त्वांचा अवलंब करून तप केले पाहिजे व अंती संसारत्याग केला पाहिजे. संसारत्यागावाचून निर्वाण वा मोक्ष प्राप्त होणार नाही, अशी या दोन्ही पंथांची शिकवण आहे.

त्यांचा निवृत्तिवाद
 जैन व बौद्ध यांचा निवृत्तिवाद व त्यांची अहिंसा यामुळे भारताची अतिशय हानी झाली, असे अनेक पंडितांचे मत आहे. सम्राट अशोक, हर्ष यांच्यावर याच कारणामुळे डॉ. देवदत्त भांडारकर, डॉ. कन्हय्यालाल मुनशी स्वा. सावरकर यांनी प्रखर टीका केली आहे. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहता या दोन पंथांच्या निवृत्तिवादाचा किंवा त्यांच्या अहिंसेचा फारसा प्रभाव येथे पडला होता असे दिसत नाही. अशोकाच्या काळापासूनच या पंथांचे प्रचारक महाराष्ट्रात आपल्या तत्त्वांचा उपदेश करीत होते. येथे त्यांनी अनेक मठही स्थापन केले होते. दोन्ही पंथांना राजाश्रयही भरपूर मिळाला होता. पण महाराष्ट्रात या दोन्ही पंथांना कधी अनुयायी फारसे मिळाले नाहीत आणि त्यांच्या वरील तत्त्वांच्या प्रभावामुळे येथले कर्तृत्वही मरगळलेले दिसत नाही. रणविद्या,