पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३३
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

आणि या काळातही तिचे संरक्षण या ग्रामसभांनीच केले असे ते म्हणतात. डॉ. रमेशचंद्र मुजुमदार, डॉ. जयस्वाल, डॉ. वेणीप्रसाद, अशांसारख्या थोर पंडितांनीही या स्वायत्त संस्थांची अशीच महती गायिली आहे. तेव्हा शासनाचे स्वरूप पाहताना या संस्थांच्या अभ्यासाला महत्त्व येणे अपरिहार्यच आहे.

त्यांचे महत्त्व
 स्थानिक स्वराज्ये व तशाच स्वरूपाच्या व्यावसायिक संस्था यांना संस्कृतीच्या इतिहासात फार मोठे स्थान आहे यात शंका नाही. माझ्या गावचा, माझ्या प्रदेशाचा माझ्या संस्थेचा कारभार मी पाहतो, त्याच्या उन्नति अवनीतीची जबाबदारी माझ्यावर आहे, ही जाणीव मानवी कर्तृत्वाला अत्यंत पोषक अशी आहे. जबाबदारी अंगावर पडली, त्या जाणिवेने माणसे कामे करू लागली की सर्व प्रकारचे चिंतन त्यांना करावे लागते. कर्ती माणसे जमविणे, त्यांना संघटित करणे, त्यांच्याकडून काम करून घेणे, कार्याची योजना आखणे, त्वरित निर्णय घेणे, यशापयशाची कारणमीमांसा करणे हे सर्व गुण व्यक्तीच्या ठायी वा स्वायत्तसंस्थांतील कारभारामुळे निर्माण होतात आणि त्यातूनच समाजप्रगतीला अवश्य ती सामूहिक भावना, संघभावना लोकांच्या ठायी उद्भवते व पोसली जाते. व्यक्तीच्या सर्व मानसिक, बौद्धिक गुणांचा विकास घडविणे हेच लोकशाहीचे अंतिम उद्दिष्ट असते. आणि राष्ट्राच्या प्रगतीला अवश्य अशी ही शक्ती असल्यामुळे लोकायत्त संस्था हा समाजाचा खरा कणा मानला जातो. तेव्हा अशा प्रकारच्या संस्था प्राचीन महाराष्ट्रात होत्या किंवा काय, असल्यास त्यांचे स्वरूप काय होते, त्या काय कार्य करीत व त्याचे समाजाला फल काय मिळत होते हे पाहणे अत्यंत अवश्य आहे.
 अशा तऱ्हेच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्रात अखिल भारतात प्राचीन काळी होत्या याबद्दल दुमत नाही. राष्ट्र, विषय, भुक्ती व ग्राम हे जे राज्याचे विभाग त्यावरचे मुख्य अधिकारी हे राजाने नेमलेले असत आणि ते सर्वत्र आनुवंशाने त्या पदावर येत. राष्ट्रपती, विषयपती, भोगपती असे त्यांना म्हणत. ग्रामाच्या अधिकाऱ्याला ग्रामपती किंवा ग्रामकूट म्हणत. या प्रत्येक राजपुरुषाच्या साह्याला सभा, समिती, पंचायत अशा नावाचे एक प्रतिष्ठित पुरुषांचे मंडळ असून राष्ट्राच्या, विषयाच्या वा ग्रामाच्या शासनात त्यांना महत्त्वाचे स्थान असे. मंडळाच्या सभासदांना कोठे महाजन म्हणत, कोठे महत्तर म्हणत त्यांची निवड कशी होत असे याविषयी काही माहिती उपलब्ध नाही बहुधा त्या त्या विभागाचे राजपुरुष त्यांची नेमणूक करीत असावे असा पंडितांचा तर्क आहे.

त्यांचे कार्य
 या ज्या महाजनसभा किंवा महत्तरसभा त्यांना संधिविग्रह सोडून आपल्या प्रदेशाचा