पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३१
राजसत्ता
 

प्रत्यक्षात आणण्याचा या महाराष्ट्रीय राजपुरुषांनी कसोशीने प्रयत्न केला असे इतिहास सांगतो. आणि हे सर्व घटनात्मक बंधने नसताना ! लोकसत्ता झाली तरी तिचे यश नागरिकांच्या व राज्यकर्त्यांच्या विवेकनिष्ठेवरच, चारित्र्यावरच अवलंबून असते. त्याअभावी देशाचे काय होते ते आज आपण पाहातच आहो. तेव्हा ही विवेकनिष्ठा त्या प्राचीन राजपुरुषांनी सांभाळली हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीला निस्तुळ असे भूषण आहे.
 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन '- संपादक डॉ. यजदानी - या ग्रंथात सातवाहन ते यादव या घराण्यांचे इतिहास प्रा . गुर्टी वेंकटराव, डॉ. आळतेकर व प्रा. नीळकंठशास्त्री यांनी लिहिले आहेत. त्यांनी त्या घराण्यातील राजपुरुषांविषयी हेच मत व्यक्त केले आहे. तेव्हा त्यांच्या शब्दातच या लेखाचा समारोप करणे उचित होईल. प्रा. वेंकटराव म्हणतात, 'प्रजासुखे सुखं राज्ञः । हेच सातवाहनांचे ब्रीद होते, असे सर्व उपलब्ध कोरीव लेखांच्या आधारे दिसते.' (पृ. १३१ ). वाकाटकांविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, 'त्यांचा कारभार अतिशय दक्ष व कार्यक्षम होता. या राजांनी सर्व शासन व्यवस्थित चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्यवेक्षक नेमले होते. वाकाटकांचे हे मोठे वैशिष्टय होय.' (पृ. १९४, १९६ ) . 'चालुक्य राज्ये सतत सर्व राज्यभर स्वतः फिरत असत. ते एकतर मंत्रिपरिषदेत असतील किंवा रणांगणात सैन्याच्या अग्रभागी सापडतील, अशी त्यांची कीतीं होती.' असा नीळकंठशास्त्री यांनी बदामीच्या चालुक्यांचा गौरव केला आहे. कल्याणीचे चालुक्य व यादव या घराण्यांविषयी असेच धन्यतेचे उद्गार या ग्रंथात आढळतात.
 या सहा घराण्यांची सत्ता सध्याच्या शास्त्राप्रमाणे पाहता सर्वस्वी अनियंत्रित अशी होती. 'धर्मशास्त्राची बंधने त्यांच्यावर होती हे खरे. पण ती विवेकबंधने होत. ती बहुधा ग्रंथांतच राहतात. हाती सत्ता आल्यानंतर त्यांना कोणी जुमानीत नाही. बहुतेक सत्ताधीश ती पायदळी तुडवितात. सत्तेमुळे मनुष्य भ्रष्ट होतो आणि ती सत्ता अमर्याद असली म्हणजे तर भ्रष्टतेला मर्यादाच राहात नाही. हे वचन जगात सर्वत्र सत्य ठरते. मानवी स्वभावच तसा आहे. तेव्हा तसे घडले तर नवल नाही. न घडले तर मात्र नवल आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रस्तुत कालखंडात हे नवल घडले हे सत्य आहे. प्रथमारंभी सातवाहन नृपतींनी या भूमीच्या राजकीय संस्कृतीला जी श्रेष्ठ प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती पुढील वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव या राजवंशांतील पुरुषांनी तशीच, त्याच पातळीवर टिकवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न केला व त्यात बव्हंशी यशही मिळविले. या भूमीच्या कोणत्याही सुपुत्राला त्या संस्कृतीचे हे रूप पाहून धन्यताच वाटेल.