पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७३
महाराष्ट्रीय राजघराणी
 

चालुक्यांनी इ. स. ५५० पासून इ. स. ७५३ पर्यंत राज्य केले. नर्मदेपासून थेट दक्षिणेस रामेश्वरापर्यंत यांचे अधिराज्य होते. कावेरी नदीच्या दक्षिणेचे पांड्य, चोल, केरल राजे, कांचीचे पल्लव राजे, म्हैसूरचे गंगराजे, वनवासीचे कदंब, कोकणचे मौर्य या सर्वांना चालुक्यांनी अनेक वेळा जिंकून त्यांच्यापासून करभार घेतला होता व त्यांना आपले मांडलिक बनविले होते. गुजराथ, माळवा, कोसल, चेदी (जबलपुर परिसर ) या देशांवर त्यांची अधिसत्ता प्रस्थापित झाली होती. कनोजचा हर्षवर्धन हा महत्त्वाकांक्षी होता. दक्षिणेत आपले साम्राज्य स्थापण्याची त्याची मनीषा होती. पण चालुक्यराज सत्याश्रय पुलकेशी याने नर्मदेच्या उत्तरेलाच त्याला गाठून त्याचा पराभव केला व दक्षिणेवरील आपले अधिराज्य अभंग राखले. सातवाहनाप्रमाणेच त्याचे अश्व त्रिसमुद्रपीततोय होते.
 यानंतर राष्ट्रकूटांचा उदय झाला. या घराण्याचा संस्थापक दन्तिदुर्ग हा चालुक्यांचाच एक सेनापती होता. ७५४ साली त्याने संधी साधून कोसल प्रदेशातील शिरपूर, रायपूर व नागपूरजवळील रामटेक येथील राजांचा पराभव करून तेथे आपली स्वतंत्र सत्ता स्थापिली. आणि लवकरच खानदेश, नाशिक, पुणे, सातारा या प्रांतांत तिचा विस्तार केला. दन्तिदुर्गाच्या या घराण्यात गोविन्द (३ रा), कृष्ण ( ३ रा ) असे महापराक्रमी राजे झाले. पांड्य, चेर (केरळ), चोल, पल्लव (कांची ), गंग ( कर्नाटक ), वेंगी ( चालुक्यांची पूर्वेकडील शाखा ) या दक्षिणेतील सर्व राजांना जिंकुन त्यांनी रामेश्वरापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार तर केलाच, पण तेवढ्यावर संतुष्ट न राहता त्यांनी उत्तरेवर स्वाऱ्या करून गुजराथ, माळवा, ओरिसा हेही प्रदेश जिंकले. त्या वेळी मगधाचे वैभव नष्ट होऊन कनोज ही उत्तरेतील साम्राज्याची राजधानी झाली होती तीही राष्ट्रकूटांनी जिंकली व आपली सेना थेट हिमालयापर्यंत नेऊन भिडविली. या पराक्रमामुळे राष्ट्रकूटांची, भारताच्या इतिहासात मौर्य, गुप्त या साम्राज्यकर्त्या घराण्यांच्या इतकीच महती मानली जाते. आपली कीर्ती अशी अमर करून हे घराणे इ. ९७३ साली अस्तास गेले.
 त्यांच्यामागून चालुक्य घराणे पुन्हा उदयास आले. हे कल्याणीचे चालुक्य होत. आधीचे जे बदामीचे चालुक्य त्यांच्याशी यांचा नेमका संबंध काय हे अजून निश्चित झालेले नाही. पण ९७३ साली उदयास आलेला तैलप हा त्यापूर्वीच्या चालुक्यांच्याच दूरच्या शाखेपैकी असावा असे पंडितांचे मत आहे. तैलपाचे वंशज चालुक्य है पूर्व-चालुक्यांच्याच पदव्या घेतात व त्यांच्याप्रमाणेच आपले गोत्रही मानव्य हेच सांगतात. त्यांनी ११८९ पर्यंत महाराष्ट्रावर सत्ता चालविली. यांनीही सर्व दक्षिण जिंकली होती, आणि उत्तरेकडे स्वाऱ्या करून बंगाल, आसाम, मगध, कनोज, नेपाळ या प्रदेशांच्या राजांनाही नमविले होते. काही पंडितांच्या मते कवी बिल्हण याने केलेली ही दरबारी अतिशयोक्ती असावी. तसे काही असले तरी हे उत्तर चालुक्य बदामीच्या पूर्व चालुक्यांइतकेच पराक्रमी होते यात शंका नाही.