महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्या अंतर्गत त्यांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले. एकूणच ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात आधुनिकीकरणाची प्रबोधन परंपरा निर्माण झाली. या परंपरेत भारतीय मानदंड निर्माण करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने पुढे महाराणी चिमणाबाई यांनी स्त्रीउद्धाराचे कार्य हाती घेतले. मुलींसाठी प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या चिमणाबाईंनी बालविवाहाची प्रथा बंद करण्याची मागणी केली होती.
भारतातील बहुतांश राजघराण्यातील स्त्रियांचे आयुष्य राजवाड्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. या बाबीला बडोदा संस्थान अपवाद होते. कारण सयाजीरावांनी आपल्या पत्नीला देशी शिक्षिकांबरोबरच विदेशी शिक्षिकांकडूनही शिक्षण दिले. १८८७ च्या पहिल्या परदेश वारीपासून सर्व २६ परदेश दौऱ्यात चिमणाबाईंना आपल्यासोबत ठेवले. परदेशवारी करणाऱ्या चिमणाबाईं या भारतीय राजघराण्यातील बहुधा पहिल्या महिला असतील. या सगळ्याचा परिणाम म्हणून चिमणाबाई एक स्वतंत्र दृष्टी असणारे त्याचप्रमाणे बौद्धिकदृष्ट्या पूर्ण विकसित व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आल्या.