लष्करात जनरलपदी कार्यरत असणाऱ्या नानासाहेब शिंदेंची दमछाक होत असे. यावरून चिमणाबाईंच्या टेनिस खेळातील कौशल्य व शारीरिक क्षमता यांची आपल्याला प्रचिती येते. महाराजांबरोबर अनेक शिकारी दौऱ्यात उत्साहाने सहभागी होणाऱ्या चिमणाबाईंनी स्वतंत्रपणे वाघ, चित्ता यांसारख्या जंगली जनावरांची सुद्धा शिकार केली होती.
दातृत्व
नवनवीन बाबी शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या चिमणाबाईंनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानातील अनेक कल्याणकारी योजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. महाराजांच्या प्रेरणेने विवाहानंतर शिक्षण घेतलेल्या चिमणाबाईंनी स्त्रीशिक्षण प्रसाराचे कार्य करणाऱ्या विविध संस्थांना वेळोवेळी उदारहस्ते आर्थिक साहाय्य केले. मुलींच्या शिक्षणासाठी चिमणाबाईंनी स्वतःच्या खानगी खर्चातून दरमहा २०० रु. ची तरतूद केली होती. त्याचप्रमाणे बॉम्बे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यासाठी महाराणी चिमणाबाईंनी स्वतंत्रपणे १,००,००० रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. ही रक्कम आजच्या रुपयात २३ कोटी ८९ लाखांहून अधिक भरते. महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळेस चिमणाबाईकडून ६,००० रु. वार्षिक अनुदानाची तरतूद करण्यात आली होती. ही रक्कम आजच्या रुपयात १ कोटी ४३ लाखांहून अधिक भरते.