पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अमेरिकेला पाठविण्यात आले. टी. सी. गजदार यांना 'बालवाडी व बालमानसशास्त्र' या विषयाच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठविले. भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या हंसा मेहता यांनाही उच्च शिक्षणासाठी सयाजीरावांनी आर्थिक मदत केली होती.
फिमेल ट्रेनिंग कॉलेज

 मुलींच्या शाळांतील स्त्रीशिक्षिकांची गरज भागविण्यासाठी प्रशिक्षित स्त्रीशिक्षिका तयार करण्याच्या हेतूने १८८२ मध्ये फिमेल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. १९०९ साली या कॉलेजमध्ये बडोदा प्रांताबाहेरील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन केले. १९३०-३१ ला फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ५६७ विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. १९३० मध्ये महाराजांनी या कॉलेजला ३०,००० रुपये निधी दिला होता. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ७ कोटी ९७ लाख रुपयांहून अधिक भरते. १८८२ ला जेव्हा फुले हंटर आयोगाकडे स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षणाचा हक्क मागत होते त्याचवर्षी सयाजीरावांनी बडोद्यामध्ये स्त्रीशिक्षिका तयार करण्यासाठी स्त्रियांचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू केले. या एकाच उदाहरणावरून सयाजीरावांची 'झेप' फुले विचाराच्या अनुकरणाबरोबर फुलेंच्याही पुढे पाऊल टाकणारी होती हे स्पष्ट होते.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १२