पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांनी समाजातील सर्व जाती जमातींमधील स्त्रियांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. १८९९ मध्ये अस्पृश्य मुलींसाठी स्वतंत्र शाळेची स्थापना करून शाळेच्या प्रमुखपदी अस्पृश्य महिलेची नियुक्ती केली. या शाळेत मुलींना फक्त शिष्यवृत्तीच नव्हे तर कपडे, निवास, भोजन व इतर जीवनावश्यक बाबी मोफत दिल्या जात होत्या. सयाजीरावांनी आदिवासी मुलींसाठी सोनगड येथे १८९६ ला पहिली मोफत निवासी शाळा सुरू केली. १९४१-४२ मध्ये या निवासी शाळेतल्या मुलींची संख्या ६२ इतकी होती. मुस्लिम समाजातील मुलींसाठी सयाजीरावांनी अनेक उर्दू शाळा स्थापन केल्या. १९४१-४२ मध्ये उर्दू शाळांमध्ये २,८०० मुली शिक्षण घेत होत्या.
 मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा लागू झाला त्याचवर्षी म्हणजेच १९०६ मध्ये १,३४१ शाळांमध्ये एकूण ९९,७६८ मुले शिकत होती. तर १९३९-४० मध्ये या शाळांची संख्या २,२९४ पर्यंत वाढली. तर या शाळांमध्ये २,६१,८५७ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यापैकी १,५२,४७१ मुले तर १,०९,३८६ मुली होत्या. अशा तऱ्हेने संस्थानातील स्त्रियांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठीच्या महाराजांच्या प्रयत्नांना लक्षणीय यश मिळाले.
माध्यमिक शिक्षण

 महाराणी हायस्कूल ही बडोद्यातील मुलींसाठी असलेली पहिली माध्यमिक शाळा होती. १९३८-३९ मध्ये महाराणी हायस्कूलमध्ये ९७२ मुली शिकत होत्या. या शाळेव्यतिरिक्त

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १०