पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणाबरोबरच लोकांमध्ये अधिकार आणि कर्तव्यांबाबत साक्षरता निर्माण करणे, ग्रंथ व वर्तमानपत्रांचे प्रकाशन आणि व्याख्याने या माध्यमातून जनजागृतीचे बहुमूल्य कार्य महाराजांनी सातत्याने केले. हे कार्यसुद्धा फुल्यांच्या अपेक्षित 'प्रबोधना'चा सकारात्मक विस्तारच आहे.
सत्यशोधकांशी जिव्हाळा
 १८८३ ते १८९० या वर्षात फुल्यांचे बडोद्याला सातत्याने जाणे-येणे होते. यामध्ये एकदा ते तीन महिने बडोद्यात राहिले होते. १८८४ च्या दरम्यान धामणस्करांकरवी महाराजांनी फुल्यांना बडोद्याला बोलावले. समाजसुधारणेवर त्यांची २-३ व्याख्याने ठेवली. हेच धामणस्कर पुढे १९०१ मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण झाले. नामांकित कंत्राटदार असणाऱ्या स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू या प्रमुख सत्यशोधक नेत्याला सयाजीरावांनी आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामाचे काम दिले. दामोदर सावळाराम यंदे आणि रामजी संतुजी आवटे यांनी ११ ऑक्टोबर १८८५ रोजी 'बडोदा वत्सल' हे सत्यशोधकी वर्तमानपत्र बडोद्यात सुरू केले. तर ३१ नोव्हेंबर १८९३ रोजी दामोदर सावळाराम यंदे यांनी 'श्री सयाजीविजय' हे नवे साप्ताहिक स्वतंत्रपणे सुरू केले.

 १८८५ मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात शेटजी-भटजींच्या विरुद्ध सत्यशोधकांच्या ज्या सभा होत त्यावेळी सत्यशोधक समाजातर्फे सयाजीरावांचा सत्कार झाला होता अशी आठवण

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / ११