पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
हिंदू पुरोहित कायदा

 जगातील सर्व राजसत्तांचा इतिहास तपासला असता एक बाब स्पष्ट होते की, धर्मसत्ता कायमच राजसत्तेच्या डोक्यावर बसलेली असते. धर्मसत्तेचा मानसशास्त्रीय दबाव घेऊनच राजसत्ता कार्यरत असते. धर्माचा निखळ वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारे सयाजीराव महाराज मात्र याला अपवाद होते. वैयक्तिक जीवनात देव, धार्मिक कर्मकांडे याबाबत विरक्त असणाऱ्या सयाजीराव महाराजांनी एखाद्या मंदिरासाठी मदत दिल्याचा किंवा एखाद्या मंदिरात श्रद्धेने नियमित पूजा-अर्चा केल्याचा पुरावा सापड नाही. कर्मकांडमुक्त 'मानसिक पर्यावरणा'त वैज्ञानिक पद्धतीने धार्मिक श्रद्धांचा विचार करणाऱ्या सयाजीरावांनी ३० डिसेंबर १९१५ रोजी हिंदू पुरोहित कायदा हा क्रांतिकारक कायदा लागू केला. अशा प्रकारचा हा जगातील पहिला आणि आज अखेरचा एकमेव कायदा आहे.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / ६