पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचबरोबर जर पत्नी लग्नाच्या वेळी इतर पुरुषाकडून गरोदर असल्याचे लग्नानंतर पतीला आढळून आल्यास किंवा पत्नीने दुसरा पती केला असेल, तर त्या पुरुषाला आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोट मागण्याचा अधिकार होता. या मुख्य कलमांबरोबरच पत्नीच्या व तिच्या मुलाच्या उदरनिर्वाह आणि संगोपनाची व्यवस्था करण्याबद्दलचे नियमही या कायद्यात करण्यात आले होते.

 वारसा हक्काने हिंदू महिलांना संपत्तीत हिस्सा देणारा 'हिंदू स्त्रियांचा संपत्तीतील हक्क कायदा १९३३ साली महाराजांनी बडोद्यात लागू केला. असा कायदा करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. मृत मुलींच्या मुलांना जिवंत मुलींबरोबर संपत्तीत वाटा देण्याची सयाजीरावांनी या कायद्यात केलेली तरतूद स्वतंत्र भारतात ७० वर्षांनंतरदेखील लागू होऊ शकली नाही यातून सयाजीरावांच्या या कायद्याचे क्रांतिकारकत्व सिद्ध होते. ब्रिटिश भारतात 'द हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपटी ॲक्ट' हा कायदा १९३७ मध्ये म्हणजेच बडोद्यानंतर ४ वर्षांनी पास झाला. तर स्वतंत्र भारतात १९५६ मध्ये 'हिंदू सक्सेशन ॲक्ट' लागू झाला. या कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास केल्यास १९३३ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात लागू केलेला हा कायदा अधिक प्रगत व परिणामकारक असल्याचे स्पष्ट होते.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ४६