पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येथील राम आणि लक्ष्मणाचे मंदिर, द्वारका येथील वसईजवळील जुनागढ मंदिर, पिलूद्र येथील सीतलमाता मंदिर आणि पाटण येथील राणीवाव यांची निवड केली होती. यातील मोठेरा येथील सूर्यमंदिर संस्थानातील महत्त्वाच्या स्थापत्य रत्नांपैकी एक आहे.

 पुरातत्त्वीय उत्खननासाठी चार जागा निवडण्यात आल्या. यामध्ये काठियावाडमधील अमरेली आणि मूल- द्वारका, दक्षिण गुजरातमधील कामरेज आणि उत्तर गुजरातमधील पाटण यांचा समावेश होता. कामरेज येथे ख्रिस्तपूर्व काळातील कर्षपणास नाणी सापडली. तसेच अज्ञात चिन्हे असणारी उज्जैन वा अवंती क्षेत्राची नाणीदेखील सापडली. अमरेली येथील उत्खननात गुप्त कालखंडातील २०० नाण्यांबरोबरच विविध प्राचीन कालखंडातील आश्चर्यकारक वस्तू आढळून आल्या.

 मूल-द्वारका हे बडोदा संस्थानातील काठियावाडच्या पश्चिमेचे छोटेसे बंदर होते. महाभारतातील जुने द्वारावती म्हणजे हेच ठिकाण असल्याचे मानले जाते. या ठिकाणच्या उत्खननात मोठ्या दगडांनी बांधलेल्या मध्ययुगीन कालखंडातील भिंतींचे अवशेष सापडले. या भिंतींचे काही अवशेष समुद्रातदेखील सापडले. याचबरोबर उत्तर गुजरातमधील पाटण येथील सिद्धराज राजाच्या काळात बांधलेल्या जुन्या सहस्रलिंग तलावाचे परीक्षण करण्यात आले. या ठिकाणच्या उत्खननात कालव्यातील पाणी पातळीचे नियंत्रण करणारी अद्भुत यंत्रणा, पाण्याचे कालवे, गाळाचे खड्डे व दरीवरून पाणी वाहून नेणाऱ्या पुलाचे अवशेष सापडले. यामुळे या ठिकाणचे पुरातत्त्वशाखीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३५