पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राच्यविद्या संस्था

 महाराजांच्या धर्म साक्षरतेच्या उपक्रमात प्राच्यविद्येचा समावेश होता. भारतीय संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने प्राचीन ग्रंथांच्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह, संरक्षण आणि संपादन करण्याचे महत्त्व सयाजीरावांनी जाणले होते. त्यामुळेच १८८७ च्या पहिल्या युरोप दौऱ्यात सयाजीरावांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सयाजीरावांच्या सूचनेप्रमाणे सर्वप्रथम १८९३ मध्ये बडोद्यातील विठ्ठल मंदिरातील संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला. सुरुवातीला या संस्कृत हस्तलिखितांचे संवर्धन बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररीत करण्यात आले. यामध्ये महाराजांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्या ६३० छापील वैयक्तिक ग्रंथसंग्रहाची भर पडली. पुढे यज्ञेश्वर शास्त्री यांच्या ४४६ हस्तलिखितांसह छापील ग्रंथ, महाराणी चिमणाबाई यांच्याकडून राजवाड्यातील ५ चित्रांची धातुपट्टी या संग्रहास भेट मिळाली. १८९३ मध्येच सयाजीरावांनी संस्कृत ग्रंथांचे प्रमुख केंद्र असलेल्या पाटण येथे लहान स्वरूपातील प्राच्यविद्या संस्थेची सुरुवात केली होती. त्यानंतर सयाजीरावांनी भारताच्या विविध प्रांतात फिरून हस्तलिखितांचे संकलन, अध्ययन व अनुवादाची जबाबदारी मणिभाई, नभुभाई द्विवेदी, अनंतकृष्ण शास्त्री यांच्यावर सोपविली. सयाजीरावांच्या आज्ञेनुसार संपूर्ण भारतात सात वर्षे भ्रमंती करून अनंतकृष्ण शास्त्री यांनी १०,०००

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ३१