पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आहे. गुजरातमधील अंत्यज आपापली धार्मिक गृहकृत्ये आपल्याच जातीतील पुरोहिताकडून करून घेत. या पुरोहितांना गरोडा म्हणत. अस्पृश्य जातींच्या या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी ऑगस्ट १९१३ मध्ये गरोडा पाठशाळेची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच वर्षी या शाळेत १० अस्पृश्य विद्यार्थी संस्कृत शिक्षण घेत होते. त्यांना दरमहा प्रत्येकी ८ रु. शिष्यवृत्ती देण्यात आली. या पाठशाळेच्या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ वर्षांचा होता.

 या पुरोहित प्रशिक्षण शाळेच्या माध्यमातून ब्राम्हणेतरांमध्ये धार्मिक विषयांचे ज्ञान प्रसारित करण्याचा सयाजीरावांचा उद्देश होता. १९१७ साली या शाळेला भेट दिल्यानंतर सयाजीरावांनी शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे आदेश दिले. कडी प्रांतातील अस्पृश्य लोकांमध्ये धर्मोपदेश देण्यासाठी १९२४ पासून यतवेश्वर महादेव मंदिराकडून धर्मोपदेशक नेमले जात होते. त्यांना वर्षाला १२० रु. मानधन दिले गेले. आधुनिक कालखंडात भारतातील सयाजीराव हे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी अस्पृश्यांना संस्कृत ज्ञानभांडाराची दारे १९१३ मध्ये खुली केली.

 सयाजीरावांनी हिंदू धर्मातील सर्व जातींना संस्कृत शिक्षण देण्याच्या हेतूने संस्कृत पाठशाळा अमुक एका वर्गासाठी नसून हिंदूतील सर्व जातीसाठी आहे, असा हुकूम काढला. या हुकूमात सयाजीराव म्हणतात, 'बडोद्यात संस्कृत पाठशाला या नावाची संस्था काढण्यात आली आहे आणि तत्प्रीत्यर्थ पुष्कळ

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २६