पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेले असता शिवदत्त नावाचे मारवाडी जोशी महाराजांना भेटले. ते वारंवार बडोद्याला येत. राजवाड्याच्या देवघरातील पुराणोक्त पद्धतीने होणाऱ्या धर्मविधी पाहून त्यांना आश्चर्य वाटत असे. त्यांनी महाराजांना रजपुतांमधील वेदोक्त विधीप्रमाणे धार्मिक विधी का होत नाहीत याचा शोध घेऊन हे विधी वेदोक्त पद्धतीने सुरू करावेत असे अनेक वर्षे लेखी अर्ज देऊन सुचविले होते. समक्ष भेटूनही ते याबद्दल महाराजांना सांगत असे.

 जोधपूर येथे रजपुतांचे विधी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर बडोद्यातही वेदोक्त पद्धतीने विधी सुरू करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. यासंदर्भात महाराजांनी राजारामशास्त्री टोपले या संस्कृत पाठशाळेतील विद्वान शास्त्रीशी चर्चा केली. महाराजांशी बोलताना ही मंडळी त्यांचे क्षत्रियत्व आणि वेदोक्त यांची बाजू घेत. पण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मात्र माघार घेत. यावर उपाय म्हणून महाराजांनी २८ डिसेंबर १८९५ रोजी आप्पासाहेब मोहिते यांची नायब खानगी कारभारी म्हणून नेमणूक केली. हीच वेदोक्त प्रकरणाची सुरुवात होती. या सर्व प्रकरणात मोहितेंबरोबर धामणस्करांसारखी मंडळीही होती. बडोद्यातील ब्राह्मणांनी महाराजांविरुद्ध प्रचार सुरू केला, त्यांच्यावर बहिष्कार टाकला. परंतु महाराजांची पूर्वतयारी पक्की असल्यामुळे त्यांनी मे १८९६ मध्ये 'पुढील दसऱ्यापासून राजवाड्यातील कृत्ये वेदोक्त पद्धतीने करावी' असा हुकूम दिला. १५ ऑक्टोबरपासून या हुकुमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मोहितेंनी पार पाडली.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २२