पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मार्गदर्शन अभ्यासल्यास त्यांची भूमिका समजून घेणे सोपे जाते. २७ जुलै १८८१ ला सयाजीरावांना 'राजवाडा विभाग' या विषयावर दिलेल्या व्याख्यानात सर टी. माधवराव सांगतात, "धार्मिक कार्ये आणि दानधर्मावर होणारा खर्च जास्त आहे. त्यामुळे या खर्चात वाढ होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी. आवश्यक आणि शक्य असेल तेव्हा या खर्चाचे पुनर्समायोजन करण्यात यावे. "

 या शिकवणीनुसार समाजातील श्रीमंत व्यक्तींऐवजी केवळ गरजू व्यक्तींनाच खिचडी व ग्यारमीचा लाभ मिळावा यासाठी १८९३ मध्ये सयाजीरावांनी एक हुकूम काढला. जातीचा निकष न लावता सर्व जातीतील निराश्रित, अपंग, अंध, विधवा स्त्रिया, लहान मुले व गरजू व्यक्तींची समितीच्या माध्यमातून निवड करून त्यांना पास देण्यात यावेत आणि पासधारक व्यक्तीलाच खिचडी-ग्यारमी द्यावी असा हुकूम सयाजीरावांनी १६ जून १८९३ रोजी काढला. त्यामुळे ब्राह्मण आणि मुसलमान व्यक्तींबरोबरच इतर जातीतील गरजू व्यक्तींना देखील याचा लाभ मिळू लागला. १९०५-०६ मध्ये १,०४१ हिंदू व ८०८ मुसलमान व्यक्तींना हे पास देण्यात आले.

 खिचडी - ग्यारमीप्रमाणेच श्रावण महिन्यात ब्राह्मण वर्गाला दिली जाणारी दक्षिणा ही देखील पूर्वापार चालत आलेली परंपरा होती. पेशवाईच्या काळात ब्राह्मणांकडून प्राचीन विद्या आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्याचा

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १८