पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल सयाजीरावांच्या म नितांत आदर होता. त्यामुळेच ते फुल्यांचा उल्लेख नेहमी महात्मा असा करत. जोतीरावांना महात्मा म्हणून संबोधणारे सयाजीराव हे पहिले होते. ही बाब सयाजीरावांच्या द्रष्टेपणाची साक्ष तर देतेच परंतु फुले विचाराची मौलिकता महाराजांनी किती नेमकेपणाने ओळखली होती हे स्पष्ट करते. फुले पती-पत्नींना सयाजीरावांनी केलेली मदत ही महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेसाठीसुद्धा महत्त्वाची होती. फुल्यांच्या मृत्यूनंतर सयाजीरावांनी सावित्रीबाईंना पेन्शन सुरु करून फुल्यांच्या विचार कार्याचा वारसा सन्मानाने जपला. हा इतिहास प्रेरणादायी आहे. पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये 'निरक्षर' राहिलेल्या बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी फुले दाम्पत्याने स्वीकारलेला शिक्षण प्रसाराचा मार्ग सयाजीरावांच्या समाजसुधारणेच्या धोरणाशी नाते सांगणारा होता. महात्मा फुलेंप्रमाणेच भारतातील पहिली स्त्रीशिक्षिका सावित्रीबाई फुलेंच्या जीवनात सयाजीरावांनी बजावलेली खंबीर 'पाठीराख्या'ची भूमिका आजवर अज्ञात राहिली. हा अज्ञात इतिहास समजून घेणे आपल्या इतिहास साक्षरतेला 'पूर्णत्व' प्राप्त करून देणारा ठरेल.

●●●
महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / २०