पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थानांबरोबरच मुंबई व मद्रास हे दोन प्रांतदेखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकार चळवळीच्या विकासासाठी नावाजले जात होते. ब्रिटिश भारतातील विविध प्रांत व संस्थानांच्या सहकारविषयक कार्याचे 'मूल्यमापन 'त्यांच्या प्रदेशातील सहकारी संस्थांची स्थिती आणि सहकारविषयक ज्ञानप्रसारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अशा दोन प्रमुख निकषांवर करणे गरजेचे ठरते.

भारतातील विविध प्रांत व संस्थानांतील सहकारी संस्था आणि सभासद संख्या

 भारतातील मुंबई आणि मद्रास प्रांत आणि बडोदा, म्हैसूर, कोचीन व त्रावणकोर संस्थानांतील १९३१-३२ मधील सहकारी संस्थांच्या संख्यात्मक वाटचालीची तुलना केली असता पुढील बाबी लक्षात येतात.

 त्रावणकोर संस्थानात ५१ लाख लोकसंख्येसाठी १,८१८ सहकारी संस्था काम करत होत्या. त्रावणकोरच्या १० हजार लोकसंख्येमागे सुमारे ३६ सहकारी संस्था अस्तित्वात होत्या. १२ लाख इतकी तुलनेने सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या कोचीन संस्थानात २४६ सहकारी संस्थांचे जाळे पसरले होते. तर १० हजार लोकसंख्येमागील सहकारी संस्थांचे प्रमाण केवळ २० सहकारी संस्था इतके होते. या पार्श्वभूमीवर २४ लाख लोकसंख्या असलेल्या बडोदा संस्थानात १० हजार लोकसंख्येमागे सर्वाधिक ४३ सहकारी संस्था कार्यरत होत्या. बडोद्यात यावर्षी एकूण १,०६३ सहकारी संस्था अस्तित्वात होत्या.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३६