पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयोजन करणे ही कामे या संस्थेमार्फत केली जात होती. १९२६ साली महाराजांच्या राज्यारोहण सुवर्ण महोत्सवानिमित्त या संस्थेचे नामकरण 'श्री सयाजी सहकार सेवा संघ' करण्यात आले. १९२७-२८ साली या संस्थेची सभासद संख्या ४७४ व मिळकत ४,३०८ रुपये होती. या संस्थेमार्फत ३ सहकार परिषदांचे आयोजन सिद्धापूर, विहार आणि अमरेली या ठिकाणी करण्यात आले होते.

 मध्यवर्ती सहकारी प्रशिक्षण संस्थेच्या सभासद संख्येत १९३८-३९ मध्ये घट होऊन ८९४ वरून ८११ पर्यंत कमी झाली. मात्र या सभासद संख्या घटीचा कोणताही परिणाम संस्थेच्या कामकाजावर झाला नाही. मध्यवर्ती सहकारी संस्थेला संस्था सभासद आणि वैयक्तिक लोकांचे मिळून सुमारे १,६५९ रुपये शुल्क प्राप्त झाले. या संस्थेकडून दीर्घकाळापासून सहकार प्रशिक्षणाचे कार्य सुरू होते. या अंतर्गतच सयाजीरावांच्या आदेशावरून ३ जिल्हास्तरीय सहकार प्रशिक्षणवर्गाचे आयोजन केले गेले. या प्रशिक्षण वर्गामध्ये सहकाराचे कामकाज कसे चालते याचे प्रशिक्षण सहकारी संस्थांच्या सचिवांना दिले गेले. सहकार चळवळीचे महत्त्व गावोगावच्या लोकांना माहिती व्हावे यासाठी सयाजीरावांनी मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकारावर व्याख्याने द्यायला प्रोत्साहित केले.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ३४