Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोदा संस्थानात प्रथमत: १८८४ मध्ये भाऊसाहेबांची नियुक्ती असिस्टंट सरसुभे या पदावर झाली. १८८६ मध्ये त्यांना अमरेली प्रांताचे सुभेदार नेमले परंतु तेथेही ते फार काळ राहिले नाही. अवघे १० महिने अमरेली प्रांतात काम केले. महाराजांचा ३१ मे १८८७ ते २० फेब्रुवारी १८८८ असा ८ महिने २० दिवसांचा पहिला परदेश प्रवास होता. यावेळी महाराज इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. या प्रवासावेळी मुख्याधिकारी म्हणून रामचंद्र धामणस्कर यांची महाराजांनी निवड केली होती. या प्रवासाला कुटुंबातील आणि संस्थानातील लोकांचा विरोध होता. कारण समुद्र प्रवास हा त्या काळात हिंदू धार्मिक मान्यतेच्या विरुद्ध होता. त्यामुळे महाराजांच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारीही महाराजांबरोबर जाण्यासाठी टाळाटाळ करत होते. अशा पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे मुख्याधिकारी म्हणून धामणस्कर यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीवर खुश होऊन महाराजांनी त्यांना १५० रु. मासिक पगारवाढ दिली. यावरून धामणस्करांच्या कार्यपद्धतीचा अंदाज येतो.
 भाऊसाहेब १८८८ ला विलायतेतून परत आल्यावर काही दिवस भाटवडेकर यांच्या जागी सेटलमेंट ऑफीसर म्हणून नेमले. नंतर त्यांना त्यांच्या स्वतः च्या विनंतीवरून नवसारी प्रांताचे सुभे म्हणून नेमले. नवसारी प्रांताचे सुभे म्हणून काही दिवस काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती कडी प्रांताचे सुभे म्हणून झाली. हे काम काही दिवस केल्यानंतर इ. स. १८९१ मध्ये त्यांची तपासणी

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / १८