Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पगार देऊन तो ४० रु. केला व नंतर तिसऱ्या वर्षी तो ६० रु. करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु भाऊसाहेबांनी तिसऱ्या वर्षी रत्नागिरीच्या कलेक्टर कचेरीत कारकुनाच्या पदासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना सेकंड क्लर्कची जागा मिळाल्यामुळे शिक्षकाची नोकरी सोडली. परंतु तेथे काम करत असलेल्या उच्च जातीय लोकांना भाऊसाहेबांना कारकुनाची नोकरी मिळाल्यामुळे खूप वाईट वाटले. कारण अशा सरकारी कचेऱ्यांमध्ये कारकुनी नोकऱ्या सुरूवातीपासूनच उच्च जातीय लोकानाच करत आलेली आहेत. त्यामुळे ही मंडळी भाऊसाहेबांचा खूप द्वेष, तिरस्कार करत असत. परंतु या द्वेषाला, त्रासाला न जुमानता भाऊसाहेब आपले काम निरलसपणे, वेळच्यावेळी व चोखपणे करत असत. परंतु त्यांनी कधीही इतरांचा द्वेष केला नाही व विनाकारण होणारा अन्यायही सहन केला नाही. त्यामुळे वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी असायची.

 भाऊसाहेबांची कामावरची निष्ठा पाहून आर्थरसाहेबांना त्यांच्याबद्दल इतकी आपुलकी होती की, ते विलायतेस गेल्यावर तेथून त्यांनी भाऊसाहेबांस भेट म्हणून एक घड्याळ व कलमदान कर्नल जेकब यांच्याकडे पाठवून दिले. आर्थर साहेब एवढेच करून थांबले नाहीत तर त्यांनी त्यावेळचे साताऱ्याचे कमिशनर ऑलिफन्ट यांच्यापाशी 'साधेल तेवढी मोठी जागा देण्याविषयी' भाऊसाहेबांची शिफारस केली. भाऊसाहेबांनी मि. सामन (अॅक्टिंग कलेक्टर, रत्नागिरी), मि. एल्फिन्स्टन (दुसरे

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / १५