पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. आईला विचारावे तर आई आपणास जाऊ देणार नाही, शिवाय पुण्याच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याची तिची ऐपतही नाही हे भाऊसाहेब जाणून होते. म्हणून त्यांनी विचार केला की, आईला न कळवता आपल्या आजीचे काही दागिने घेऊन बाकीच्या मुलांसोबत निघून जावे. असा पक्का निर्धार करून त्याप्रमाणे त्यांनी कृतीही केली.
डॉ. भांडारकरांचा सहवास
 पुढे भाऊसाहेबांच्या आईला हा सारा प्रकार कळताच भाऊसाहेबांना परत रत्नागिरीला आणण्याचा त्यांच्या आईने खूप प्रयत्न केला परंतु भाऊसाहेब यत्किंचितही आपल्या निर्धारापासून ढळले नाहीत. इकडे रत्नागिरीच्या शाळेतील बहुतांश मुले नाराज होऊन शाळा सोडून गेली. हे शाळा खात्याच्या अधिकाऱ्यास लक्षात येताच त्यांनी रसेल यांना त्या शाळेवरून काढून टाकले व त्यांच्या जागी डॉ. रामकृष्णपंत भांडारकर यांची नेमणूक केली. डॉ. भांडारकर हे खूप चांगले शिक्षक होते. त्यामुळे भाऊसाहेब व इतर बरीच मुले परत रत्नागिरीला येऊन पुन्हा त्या शाळेत जाऊ लागली. रत्नागिरीस परत आल्यानंतर भाऊसाहेबांनी आजीचे नेलेले दागिने आईच्या स्वाधीन केले. अशाप्रकारे भाऊसाहेबांनी रत्नागिरीच्या शाळेत पुन्हा प्रवेश घेऊन १८६६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात मॅट्रिक्युलेशनची परीक्षा प्रथम क्रमांकाने पास झाले.

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / १३