पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हयातीत अनुभवता आला. महाराजांनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये संस्कृत भाषेच्या संवर्धनाला अतिशय महत्व दिले होते.
 राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजावेत या उद्देशाने विधींचे मंत्र अर्थासह प्रकाशित करण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी २३ नोव्हेंबर १८८६ रोजी राजवाड्यात होणारी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. रा. रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर या तिघांनी सयाजीरावांच्या आज्ञेवरून धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा 'ऐनेराजमेहेल' नावाचा ग्रंथ तयार केला.

 १८८७ च्या पहिल्या युरोप दौऱ्यावेळी महाराजांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना दिल्या. १८९३ मध्ये संस्कृतीचे जतन करण्यासाठी हस्तलिखितांचे संग्रह आणि संपादन करण्याची गरज ओळखून महाराजांनी विद्वानांना पाटणसारख्या ठिकाणी पाठवून पोथ्यांचे अध्ययन आणि अनुवादाचे काम सोपवले. यामध्ये विठ्ठल मंदिरातील संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह, श्रीमंत संपतराव गायकवाड यांचा ग्रंथसंग्रह, पंडित यज्ञेश्वर शास्त्रींचा हस्तलिखित संग्रह यांचा समावेश झाला. याबरोबरच महाराणी चिमणाबाईंनी खाजगी देवघरातील पाच चित्रांची धातुपट्टी या संग्रहास भेट दिली. यामध्ये महाभारत (लांबी २२८ फूट), भागवत (लांबी ८४ फूट), भगवद्गीता (लांबी १०॥ फूट) आणि हरिवंश (लांबी ४८ फूट) यांचा समावेश होता.

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / ९