पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रु. हून अधिक भरते. ज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी महाराजांनी केलेल्या या गुंतवणुकीला आधुनिक भारताच्या इतिहासात तोड नाही. १९४९ ला ही संस्था महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली.
 या संस्थेत हस्तलिखितांचा संग्रह, छापील किंवा प्रकाशित पुस्तके, समिक्षित आवृत्ती विभाग, भाषांतर विभाग असे एकूण चार विभाग आहेत. या भाषांतर विभागांतर्गत हिंदूधर्मासोबतच जैन, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माची पुस्तके मराठी, गुजराती, हिंदीमध्ये भाषांतर करून धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला. यातूनच “ सयाजी साहित्य माला", “ सयाजी बाल ज्ञानमाला”, “श्री सयाजी ग्रामविकासमाला”, इ. ग्रंथमाला सुरु करण्यात आल्या.
भाषांतर शाखा

 १८८८ मध्ये भाषांतर मालेची सुरवात झाली. १८९३ मध्ये संस्थानामार्फत विद्वान लेखक नोकरीस ठेवून ग्रंथ लेखनाचे काम करण्याची व्यवस्था करण्यात आली. मनिलाल द्विवेदी यांनी या योजनेअंतर्गतच पाटण येथील प्रसिद्ध जैन भांडारातील २१ ग्रंथांचे संशोधनात्मक भाषांतर केले होते. हीच भाषांतर शाखेची पहिली सुरुवात होय. याविषयी बोडस म्हणतात, “ श्रीमंत महाराजांची स्वारी कडीप्रांती गेली असता पट्टन येथील संस्कृत ग्रंथ संग्रह त्यांचे पाहण्यात आला. ज्यास संस्कृत येत नाही अशा लोकास त्यातील ज्ञानाचा लाभ जरूर व्हावा या हेतूने इतिहास, शास्त्र, नाटक व धर्म

महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / ११