पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 केतकरांचे जातीवरचे हे संशोधन आजही समाजशास्त्रातील पहिले म्हणूनच पथदर्शी मानले जाते. पुढे बाबासाहेबांनी १९१६ मध्ये जातीच्या उत्पत्तीवरील जो निबंध अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर केला त्यातही त्यांनी केतकरांच्या या संशोधनाचा आधार घेतला होता. केतकरांची 'जात म्हणजे बंदिस्त वर्ग' ही व्याख्या बाबासाहेबांनी त्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठीच्या संशोधनात प्रमाणभूत म्हणून स्वीकारली होती. महाराष्ट्राबरोबर जगभरातील जातविषयक चर्चाविश्वाला जे संशोधन 'उपयुक्त' ठरले ते सयाजीरावांच्या पाठबळामुळे शक्य झाले होते.
ज्ञानकोशकार केतकर

 केतकरांना महाराजांनी दिलेली शिष्यवृत्ती ही खऱ्या अर्थाने भारताच्या बौद्धिक विश्वाला दिलेली देणगी आहे. याबरोबरच सयाजीरावांनी केतकरांच्या ज्ञानकोशाला भारतीय जनतेची साक्षरता वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कर्तव्यभावनेने मदत केली. केतकरांनी एकूण २३ खंडात मराठीत तयार केलेला हा ज्ञानकोश म्हणजे मराठी ज्ञानभाषा करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. १९२१ ते १९२७ अशी ७ वर्षे या ज्ञानकोशाचे काम केतकरांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. हा ज्ञानकोश गुजराथी भाषेतही अनुवादित झाला. मराठी व गुजराथी अशा दोन्ही ज्ञानकोशांना महाराजांनी आर्थिक साहाय्य केले होते. महाराजांनी केलेल्या साहाय्याबद्दल चिं. ग. कर्वे

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १५