पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७) दुसऱ्या वर्गातल्या आजारी व दुर्बल कामगारांवर पाटणच्या दुष्काळी दवाखान्यात उपचार करून त्यांची तब्येत पूर्वपदावर आल्यावर अन्य ठिकाणी कोणतीही जबाबदारी न टाकता त्यांच्याकडून हलक्या स्वरूपाची कामे करून घेण्याचा आदेश. दुसऱ्या वर्गातील मजुरांना अनहिलवाडा या प्राचीन शहराच्या इतिहासावर आणि प्राचीन अवशेषांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने या शहराच्या अवशेषांच्या उत्खननाचे काम देण्यात आले.

 ८) कडी विभागातील दुष्काळविषयक कामांवरील अधिकारी- मजूर यांच्यातील अनावश्यक मैत्रीपूर्ण संबंध कमी करण्यासाठी या कामांची प्रत्येक व्यक्तीवरील जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश.

 ९) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार मजुरी वाटपावेळी रोखपालांची उपस्थिती अनिवार्य होती. मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या दुष्काळी कामांवरील मजुरांना रोखपालांच्या मर्यादित संख्येमुळे मजुरी मिळण्यास वेळ लागत होता. या परिस्थितीत मिस्त्री व निरीक्षकांकडून ठरावीक रक्कम सुरक्षित ठेव म्हणून जमा करून घेऊन त्यांना मजुरी वाटपाचा अधिकार देण्याचा आदेश.

 १०) वेतन अदा करण्यातील अनियमितता व भ्रष्टाचार रोखून पैसा थेट मजुरांच्या हाती पडावा व हजेरीपत्रके नीट भरली जावीत यासाठी विशेष निरीक्षक नेमण्याचा आदेश. पात्र निरीक्षक

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / २५