पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोविंद सखाराम सरदेसाई ते रियासतकार सरदेसाई
 रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई हेसुद्धा वरील प्रभावळीतील एक महत्त्वाचे नाव आहे. गोविंद सखाराम सरदेसाई ते रियासतकार सरदेसाई हा सरदेसाईंचा प्रवास १८८९ ते १९२५ या सरदेसाईंच्या सयाजीरावांच्या ३७ वर्षाच्या सेवेचा परिपाक आहे. हा कालखंड महाराजांच्या वैयक्तिक जीवनाबरोबर बडोद्याच्या सामाजिक जीवनातील क्रांतिकारक कालखंड होता. कारण या कालखंडात आदर्श राज्याचे सयाजीरावांचे स्वप्न संपूर्ण सत्यात उतरले होते. महाराजांचे कौटुंबिक जीवन, विद्या व्यासंग, धर्म सुधारणांसह वेदोक्त प्रकरण, महाराजांच्या सर्व मुलांचे शिक्षण, महाराजांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन त्यांची कन्या इंदिराराजे यांनी केलेला मराठा - आदिवासी हा क्रांतिकारक विवाह यासारख्या ऐतिहासिक घटनांमध्ये सरदेसाईंची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
 सरदेसाईंच्या बडोद्यातील नोकरीची सुरुवात महाराजांचे रीडर म्हणून झाली. महाराजांचे रोजचे टपाल व वर्तमानपत्र पाहून ती त्यांच्या सवडीप्रमाणे वाचून दाखवणे, खाजगी पत्रांची उत्तरे देणे, महाराज पुस्तके वाचत त्यातील कठीण शब्द काढून टिपणे करणे यासाठी दिवसातील दोन-तीन तास सरदेसाईंना महाराजांकडे काम असे. महाराजांचे धोरण असे होते की राजवाड्यातील किंवा संस्थानच्या प्रशासनातील प्रत्येकाने भरपूर काम केले पाहिजे.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / ८