पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांत उत्कर्षाची पहिली स्फूर्ती राष्ट्राला दाखविणारी ही विभूती असून त्यांच्याशी मी जीवनाचे पहिले धडे शिकू शकलो हे मी आपले मोठे भाग्य समजतो. त्यांची कित्येक चरित्रे प्रसिद्ध झाली; पण ती अनेक कारणांनी आज तरी लुप्त बनली आहेत. काँग्रेस व महात्मा गांधी यांच्या उद्योगाने भारतभूमीचें विमोचन परचक्रांतून झाले असे आपण समजतो. पण प्रत्यक्ष राज्यात सुधारणा करून उन्नतीचे खरे मार्ग प्रथम कृतीत आणून इंग्रज राजकर्त्यांनाही सयाजीरावांनी दभवून सोडले. इंग्रजांचा रोष झालेल्या अनेक राष्ट्रसेवकांचा त्यांनीं धैर्याने बचाव केला. सक्तीने शिक्षण व ग्रंथालयाची योजना हिंदुस्थानात प्रथम सयाजीरावांनी निर्माण केली. त १९३९ मध्ये निवर्तले आणि पुढे थोड्याच अवधीनंतर इंग्रजसत्ता संपून आमची देशी संस्थाने इतकी विलीन झाली की, आज दोनशे वर्षे इंग्रजांप्रमाणेच या आपल्या स्वदेशी राजांचा अंमल भारतभूमीवर होता हा इतिहासही आता लुप्त झाला आहे.
 माझे तर मुख्य आयुष्य सयाजीरावांच्या निकट परिचयात गेल्यामुळे माझ्या आठवणी अद्यापि ताज्या आहेत आणि त्या गोड व स्मरणीयही आहेत. त्या निमित्तानेच मी हे माझे पहिले आख्यान आज मुद्दाम येथे सांगितले आहे की, त्यावरून वाचकांस पुढील विषयाची कल्पना यावी. भलेपण मिळवायला प्राप्त परिस्थितींत प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रात भरपूर अवकाश आहे.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / २३