पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाराज असल्यामुळे ते मदत करतील का अशी शंका सरदेसाईंना होती. परंतु जदुनाथ सरकारनी आग्रह केल्याने सरदेसाईंनी महाराजांना युरोपात पत्र लिहून ३ हजार रु.ची मदत मागितली. महाराजांनी तत्काळ बडोद्यात दिवाणांना तार करून सरदेसाईंना पेशवे दफ्तराच्या कामासाठी ३ हजार रुपये पाठविण्याचा आदेश दिला. यात सयाजीरावांच्या स्वभावातील उमदेपणा स्पष्ट होतो. सयाजीरावांनी कधीही कुणाचा द्वेष आणि तिरस्कार केला नाही.
 सरदेसाईंनी इतिहासाला दिलेले योगदान विचारात घेता त्यांचे मुख्य योगदान मराठ्यांच्या इतिहासाला आहे. आज त्यांच्या लेखनात काही त्रुटी दिसतील परंतु मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना त्यांची ‘मराठा रियासत' वगळून पुढे जाता नाही. यासंदर्भात श्री. रा. टिकेकर म्हणतात, “सरदेसायांचे इतिहासकार्य म्हणजे त्यांच्या रियासती. त्यांचा विस्तार व्यापक, म्हणजे सुमारे हजार वर्षांचा इतिहास आहे. त्याची विभागणी मुसलमानी, मराठी व ब्रिटिश अशा तीन प्रमुख रियासतीत झाली असली तरी सरदेसायांचे मुख्य कार्य मराठी रियासतीचे आहे. मुसलमानी व ब्रिटिश या दोन्हींसाठी प्रत्येकी दोन दोन खंड लागले. पण मराठा रियासतींसाठी एकंदर आठ खंड लागले. " टिकेकरांच्या या मतावरून मराठ्यांच्या इतिहास लेखनाला सरदेसाईंच्या रूपाने बडोद्याचे असणारे योगदान किती मोठे होते याचा पुरावा मिळतो.

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १९