पान:महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्रांतिकारक विवाहातील यशस्वी मध्यस्थी
 सयाजीरावांच्या कन्या इंदिराराजेंनी स्वतः ठरवून १९९३ मध्ये केलेल्या भारतातील पहिल्या मराठा - आदिवासी विवाहात रियासतकार सरदेसाईंनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण होती. इंदिराराजेंचे आई-वडील ठरल्याप्रमाणे इंदिराराजेंनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदेशी विवाह करावा यासाठी कमालीचे आग्रही होते. तर केवळ पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न करणाऱ्या माधवरावांशी विवाह करण्यास इंदिराराजे इच्छुक नव्हत्या. उलट कूच बिहार या आदिवासी संस्थानच्या महाराजांचे बंधू जितेंद्र नारायण यांच्याशी विवाह करण्याचे इंदिराराजेंनी ठरवले होते. अशा परिस्थितीत सरदेसाईंनी इंदिराराजेंच्या वतीने सयाजीराव महाराज आणि महाराणी चिमणाबाई यांच्याजवळ यशस्वी मध्यस्थी केली होती. 'विवाह ठरला असल्यामुळे इंदिराराजेंनी माधवरावांशीच लग्न केले पाहिजे' असे महाराणींचे मत होते. त्यावेळी मुले आता मोठी झाली असून थोडे त्यांच्या कलाने घेणे आवश्यक असल्याचे रियासतकारांनी चिमणाबाईंना समजाविले. इंदिराराजेंवर जास्त जबरदस्ती केल्यास त्या जीवाचे बरे जास्त करून घेण्याची भीती सरदेसाईंनी व्यक्त केली. याचा महाराणींवर अपेक्षित सकारात्मक परिणाम घडून आला.

 तर कोणालाही सयाजीरावांना भेटावयाचे असल्यास आधी सूचना देण्याचा नियम महाराजांनी केला होता. प्रशासकीय सोयीसाठी हा नियम योग्य असला तरी कुटुंबीयांसाठी अतिशय

महाराजा सयाजीराव आणि रियासतकार सरदेसाई / १२