Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतः आपल्याला भेटायला आलो असतो; पण ते शक्य झालं नसल्याने, आपल्याला इथे यायचा त्रास झाला.” महाराजांची नम्रता आणि सौजन्य पाहून राजा रवी वर्मा गहिवरून गेले.
 राजा रवी वर्माची आणि महाराजांची ही दुसरी भेट होती. उटकमंड थंड हवेचे ठिकाण, त्यामुळे बाहेर मोकळ्या हवेत फिरत फिरत या सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. महाराजांनी राजा रवी वर्माला भेटीचे कारण सांगितले. महाराजांच्या राज्यरोहणाच्या दिवशी राजा रवी वर्मा महाराजांना भेटले होते. त्या घटनेला सात-आठ वर्षे झाली होती. त्यानंतर महाराजांनी बडोद्यात बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. त्यासंबंधी महाराजांनी राजा रवी वर्माला बोलता बोलता माहिती दिली. त्यातच लक्ष्मीविलास पॅलेसचे बांधकामही संपत आले होते. राजवाड्याचा दरबार हॉल सजवण्यासाठी त्यांना राजा रवी वर्मांकडून काही तैलचित्र तयार करून हवी होती. त्यात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या रामायण, महाभारत, पुराणं यांतील कथांवर आणि प्रसंगावर आधारलेली चित्रे त्यांना अपेक्षित होती. ती चित्रं राजा रवी वर्मांनी करावीत अशी इच्छा महाराजांनी बोलून दाखवली आणि त्यासाठी तुम्हाला इथवर येण्याचा त्रास दिला, अशी महाराजांनी दिलगिरीही व्यक्त केली. एवढ्या मोठ्या संस्थानाचा महाराजा; परंतु अत्यंत शालीन आणि नम्र हे पाहून टी. माधवरावांनी महाराजांच्या स्वभावाचे केलेले वर्णन राजा रवी वर्मा अनुभवत होते.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २५