Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चित्रकला हे माध्यम वापरणे हे ललितकला सुधारणा धोरण महाराजांनी अवलंबविले होते. युरोपियन मूर्तिकार ' फेलेसी' हा एक उत्तम चित्रकारही होता. महाराजांनी त्याच्याकडून काही उत्तम पेंटिंग करवून घेतलेल्या आहेत. त्यात लक्ष्मीविलास राजवाड्याच्या मुख्य जिन्यावर लावलेले एका महाराणीचे पेंटिंग फारच सुंदर बनविले आहे. चांगले कपडे घातल्यामुळे तिचे मूळचे सौंदर्य फारच खुलून दिसते. हे पेंटिंग १८९७ साली केलेले आहे. परंतु बडोद्यातला त्या काळचा सर्वोत्कृष्ट चित्रसंग्रह म्हणजे भारतीय चित्रकारांचे मुकुटमणी राजा रवी वर्मा यांच्याकडून महाराजांनी करवून घेतलेले तैलचित्रे आहेत. त्यासाठी महाराजांनी राजा रवी वर्मांना राजाश्रय देऊन राजसन्मानाने ठेऊन घेतले होते. त्यांच्यासाठी प्रशस्त हवेली बांधली होती आणि त्यात चित्रकारीसाठी एक स्टुडिओ उभारला होता.
राजा रवी वर्मा आणि बडोदा संबंध
 आज आपण जेव्हा डोळे मिटून 'या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । ' ही सरस्वती वंदना म्हणतो तेव्हा डोळ्यांसमोर शुभ्र वस्त्रातली वीणा पकडलेली सरस्वती येते. ती म्हणजे सर्वांना माहीत असलेली भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांनी चितारलेली सरस्वती ! फक्त सरस्वतीच नाही, तर सर्व हिंदू देवतांना आपल्या विलक्षण प्रतिभेने मानवी रूपात साकारणारे चित्रकार म्हणजे राजा रवी वर्मा. ते असे चित्रकार होते ज्यांनी पहिल्यांदा हिंदू देवी देवतांना सामान्य माणसांसारखं दाखवलं.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / १४