पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपयुक्तता आणि ऐतिहासिकता अधोरेखित करते. बाबासाहेब सयाजीरावांवरील मृत्युलेखात म्हणाले होते की, बडोद्याचे कायदे हे इंग्लंड-अमेरिकेपेक्षाही पुढारलेले आहेत. राजर्षी शाहूंचे वरील पत्र आणि बाबासाहेबांचा अभिप्राय यांचे एकत्र वाचन केल्यास कोल्हापूर या प्रागतिक संस्थानाच्या सामाजिक धोरणांवरील बडोद्याचा प्रभाव स्पष्ट होतो.
 मामा परमानंदांनी १८८९ मध्ये सयाजीरावांना उद्देशून लिहिलेली खुली पत्रे म्हणजे सुधारणांचा 'रोडमॅप' होता. त्यामुळेच घाटे म्हणतात त्याप्रमाणे कोल्हापुरातील सुधारणा म्हणजे बडोद्यातील सुधारणांची काही अंशी महाराष्ट्रीय आवृत्ती होती असे म्हणता येईल. मामा परमानंदांनी सयाजीरावांना लिहिलेली ही पत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. शाहू महाराजांचे गुरू फ्रेजर यांनी हा ग्रंथ शाहू महाराजांच्याकडून वाचून घेतला होता. या संदर्भात रमेश जाधव म्हणतात, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले यांचे एक मित्र - चाहते आणि त्या काळी राजकीय ऋषी म्हणून ज्यांचा गौरव होत होता त्या मामा परमानंद यांचा 'लेटर्स टू अॅन इंडियन राजा' हा ग्रंथ १८९१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. तो ग्रंथ त्यांनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांना उद्देशून पत्ररूपाने लिहिला होता. या ग्रंथाचे गुरुवर्य फ्रेजर यांनी आपल्या शिष्योत्तमाकडून म्हणजेच शाहूराजेंकडून काळजीपूर्वक वाचन करून घेतले. याच ग्रंथातील एका पत्रात शिवछत्रपती हे कसे प्रजाहितदक्ष राजे होते, त्यांचा

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४२