Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वीच्या कालखंडात ब्राह्मणवर्गाने जोतीबा फुले यांच्याशी जो तुटकपणा व बेपर्वाईची वृत्ती दाखविली ती चुकीची होती. १९०० नंतरच्या काळात पुन्हा अशीच 'चूक 'वेदोक्त प्रकरण' या गाजलेल्या प्रकरणात घडली. पत्रव्यवहारामध्ये या बाबतीत एक महत्त्वाचे पत्र आले आहे. ते पत्र सयाजीरावांनी शाहूछत्रपतींना लिहिलेले असून त्यात म्हटले आहे की, 'सातारा येथील माझ्या मनुष्याला पत्र लिहून त्याच्याजवळ कागदपत्र असतील तर ते आपल्या हवाली करण्यास कळवितो.' प्रतापसिंह महाराजांनी 'वेदोक्त विधीची पद्धत' १८३८ साली सुरू करविली व त्यासाठी उदेपूरच्या घराण्याची भोसले घराणे ही शाखा असल्याचा पुरावा उदेपूराहून आणवून घेतला होता. यासंबंधीचे हे कागदपत्र आहेत. खुद्द सयाजीरावांनी १८९६ पासून आपल्या राजवाड्यातील धर्म कृत्ये वेदोक्त पद्धतीनेच सुरू केली होती. शाहूमहाराजांनी वेदोक्त विधीबद्दल जो रास्त आग्रह धरला त्याला काही विलंब न लावता व आढेवेढे न घेता मान्यता देणे पुण्याच्या ब्राह्मण नेत्यांना शक्य होते. पण या बाबतीत योग्य ते धोरण न ठेवण्याची चूक झाली व मराठा समाजाला (म्हणजे त्यातील वरिष्ठ लोकांना) ब्राह्मणांविरुद्ध सकारण राग आला, हे उघड दिसते.”
 दि. के. बेडेकरांच्या या निरीक्षणाला आधार पुरविणारे संदर्भ शाहू पेपर्सच्या १० खंडांमध्ये आपल्याला सातत्याने भेटतात. १९०१ पासून हा संघर्ष शाहूंच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १९२२ पर्यंत जवळजवळ २१ वर्षे शाहूंच्या मनात खदखदत होता. या संदर्भात अनेक पत्रांमध्ये ते वेदोक्ताच्या निमित्ताने धर्मचर्चा करताना

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / २६