पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंतु लोकाराधनेसाठी सारे काही करणारे आणि करविणारे होते. पहिले कट्टर ब्राह्मणेतर, तर दुसरे भारतीयत्वाच्याही पलीकडे जाऊन विश्वमानव बनलेले, विश्वसंस्कृतीशी तादात्म्य पावलेले आणि भारतीय संस्कृतीकडे तटस्थ वृत्तीने पाहणारे होते. पहिल्याने आपले संस्थान क्वचितच सोडले तर दुसरे आपल्या संस्थानातच नव्हे तर आपल्या देशात हिवाळ्याच्या मोसमाखेरीज क्वचितच राहिले. मात्र अस्मानात उडणाऱ्या घारीची नजर खालच्या घरट्यातल्या पिलांवर असते तशी सयाजीरावांची नजर सदैव आपल्या प्रजेकडे होती. सयाजीराव कोणाच्याच जवळ आले नाहीत. कोणालाच त्यांनी जवळ केले नाही. बायकोला, मुलांना, नातवांना, मित्रांना. ते स्वयंकेंद्रित होते, 'इंट्राव्हर्ट' होते तर शाहू महाराज ‘एक्स्ट्राव्हर्ट’ होते. इतका मोठा फरक होता; परंतु दोघेही आपल्या तेजाने तळपले आणि भारताचे भूषण झाले." घाटेंनी अत्यंत मार्मिकपणे दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा 'एक्स-रे' काढला आहे.

 शाहू महाराज हे एखाद्या वादळाच्या झंझावातासारखे व्यक्तिमत्त्व तर सयाजीराव म्हणजे शीतल चांदणे. शाहू महाराज एखादा विचार पटला की त्याची तत्काळ अंमलबजावणी या धोरणाचे प्रवक्ते तर सयाजीराव मात्र परिणामाची तीव्रता आणि व्याप्ती याचा विचार करून कृती या धोरणाचे प्रवक्ते. दोघांच्या या स्वभावामुळे त्यांच्या सामाजिक कार्यावर फार मोठे परिणाम झाले. हे परिणाम जसे सकारात्मक होते तसे नकारात्मकही होते.

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / १२