पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांनी या मंडळातर्फे १९६२ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाने करावे असा निर्णय घेतला.

 महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीत एकूण ७ साहित्य संमेलनांत अध्यक्ष म्हणून केलेली भाषणे त्यांची साहित्यविषयक समज, सर्वसमावेशक दृष्टी आणि वैश्विक भान याची साक्ष देतात. या ७ संमेलनांमध्ये ४ मराठी व गुजराती, संस्कृत आणि हिंदी अशा प्रत्येकी १ भाषिक संमेलनांचा समावेश होतो. १८७८ पासून आयोजित होणाऱ्या मराठी ग्रंथकारांच्या संमेलनास १९०९ पर्यंत 'मराठी ग्रंथकारांचे संमेलन' असे नाव होते. १९०९ मध्ये बडोद्यातील संमेलनावेळी हे नाव बदलून 'मराठी साहित्य संमेलन' असे व्यापक नामाभिधान करण्यात आले. मुंबई येथील वनस्पतिशास्त्रज्ञ आणि लेखक के. आर. कीर्तिकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे कीर्तिकर हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष होते. बसता-उठता पुरोगामित्वाचे ढोल वाजवणाऱ्या आणि ब्राह्मणेतर चळवळीची 'पंढरी' असणाऱ्या महाराष्ट्राला हा इतिहास नवा आहे. म्हणूनच महाराष्ट्राने आपला पुरोगामित्वाचा ‘डी.एन.ए.’बडोद्याच्या ‘सयाजी लॅबोरेटरी' मध्ये तातडीने तपासून घेणे आरोग्यदायी ठरेल.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / ८