पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोल्हापूर साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविताना संधिवाताचा त्रास वाढल्यामुळे महाराज या संमेलनास उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यावेळचे बडोद्याचे हुजूर कामदार आर. एस. माने-पाटील यांनी महाराजांच्या वतीने संमेलनास उपस्थित राहून महाराजांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले. या भाषणाच्या सुरुवातीलाच महाराज सांगतात, 'मी मराठी, गुजराथी, हिंदी भाषेतील सर्व प्रकारच्या वाङ्मयाच्या वाढीसाठी गेली ५० वर्षे मदत करत आहे. या वाङ्मयांच्या वाढी का खुरडतात याचा अभ्यास करण्यात मी दीर्घकाळ घालविला आहे.' आज महाराजांचे हे विचार वाचताना आपण थक्क होतो. कारण साहित्याच्या उत्कर्षासाठी राज्यकर्त्याने हातभार लावणे हे एकवेळ आपण समजू शकतो. परंतु या वाङ्मयाची वाढ का होत नाही याचा विचार जेव्हा सयाजीराव करतात तेव्हा ही बाब आजही साहित्य क्षेत्रातील धुरिणांना आत्मटीकेकडे घेऊन जाते.

 या भाषणात विविध प्रांतातील साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर करण्याची महाराजांनी सूचना केली. लोकांनी आपल्या साहित्याची इतर प्रांतातील साहित्याशी तुलना करून आपण आणि आपले साहित्य नेमके कुठे आहे हे समजून घ्यावे अशी भूमिका मांडली. स्वातंत्र्यानंतर १२ मार्च १९५४ रोजी भारतात स्थापन झालेल्या 'भारतीय साहित्य अकादमी' या महत्त्वाच्या आणि १७ भारतीय भाषेत साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्थेची बीजे या भाषणात सापडतात. यावरून महाराजांनी केलेले चिंतन

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २६