पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्रिटिशविरोधी नसल्याचे ते स्पष्ट करतात; परंतु या व्यक्तींशी संबंधित बहुतांश लोक मात्र जहालमतवादी असून हे वर्गीकरण करणे अवघड असल्याची कबुली क्लीव्हलँड देतात. क्लीव्हलँड यांचे हे टिपण चिकित्सकपणे वाचले असता सयाजीरावांसंदर्भात नेमके कोणते धोरण अवलंबवायचे या संदर्भात ब्रिटिश सरकार पूर्णपणे गोंधळले असल्याचे लक्षात येते.

 याच टिपणात क्लीव्हलँड यांनी असंतुष्ट इजिप्शियन गटाची माहिती सविस्तरपणे दिली आहे. ब्रिटिश सरकारबाबत असंतुष्ट असणाऱ्या इजिप्शियन क्रांतिकारकांचा एक गट भारतीय क्रांतिकारकांशी संधान साधण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका क्लीव्हलँड या टिपणात व्यक्त करतात. इजिप्शियन क्रांतिकारकांकडून चालवल्या जाणाऱ्या 'La Patric Egyptienne' या पेपरमध्ये मदनलाल धिंग्रा, विनायक सावरकर आणि गंभीर गुन्हे केलेल्या तत्कालीन भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तींचा गौरव करण्यात आला होता. हा असंतुष्ट इजिप्शियन क्रांतिकारकांचा गट सयाजीरावांना अजिबात भेटता कामा नये असे क्लीव्हलँड यांनी आपल्या टिपणात स्पष्टपणे नोंदवले आहे. विशेष बाब म्हणजे सयाजीराव महाराजांच्या युरोप दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवायची की नाही अशी विचारणा करणारे पत्र लंडनमधील आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याने आपल्याला पाठवले असल्याचे क्लीव्हलँड स्पष्ट करतात.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४५