पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांचे पर्सनल सेक्रेटरी अरविंद घोष यांचे जवळचे मित्र होते, तर एस. एल. बर्वे यांनी रसेल्स सैनिकांच्या तुकडीतील शिपायावर जीवघेणा हल्ला केला होता. या तीनही व्यक्तींनी ब्रिटिश सरकारविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा संशय असला तरी सयाजीराव महाराजांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी बडोद्याच्या रेसिडंटला थेट परराष्ट्र विभागाच्या सचिवांकडे तक्रार करावी लागली.

 १९१३ मध्ये सयाजीराव महाराजांनी युरोपचा दौरा केला. या दौऱ्यात सयाजीरावांवर ब्रिटिश सरकारच्या गुन्हेगारी गुप्तचर विभागाने (Criminal Intelligence Department) सातत्याने पाळत ठेवली. या दौऱ्यात महाराजांवर पाळत ठेवणाऱ्या गुप्तहेरांनी ब्रिटिश सरकारला दोन टिपणे सादर केली. यातील दुसऱ्या टिपणात गुप्तहेरांनी केलेले महाराजांच्या दौऱ्याचे वर्णन आपल्याला शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची पुरेपूर आठवण करून देते. याचे एक उदाहरण या टिपणाच्या सुरुवातीलाच आपल्याला मिळते. पॅरिस येथील के. बनकर यांच्या कार्यालयात सयाजीरावांनी त्यांचे काही कार्यालयीन काम केल्याची शंका या गुप्तहेरांना आली. या शंकेचा पुरावा म्हणून बनकर यांच्या कार्यालयातील टेबलावर आढळलेल्या महाराजांच्या अधिकृत शिक्क्याचा उल्लेख गुप्तहेरांनी या टिपणात केला आहे.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ४१