पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यात तरुणांना शारीरिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी एक आखाडा चालवत होते. सयाजीराव या आखाड्याला प्रोत्साहन आणि मदत करू लागले. पुढे माणिक जुम्मादादांचा पट्टशिष्य बनला. गुरूच्या स्वप्नपूर्तीसाठी माणिकरावांनी दांडिया बाजारातील जुम्मादादांचा आखाडा क्रांतिकारी चळवळीतल्या लोकांचे आश्रयस्थान बनविले.

 जुम्मादादांची व्यायामशाळा ही स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या समविचारी तरुणांचा आणि कार्यकर्त्यांचा अड्डा बनत चालली होती. माणिकरावांमध्ये असणाऱ्या समाजसेवा आणि नेहमी दुसऱ्यास मदत करणे या गुणांमुळे ते महाराजांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले. देशभक्ती आणि स्वातंत्र्याच्या ध्यासाने प्रेरित करण्यासाठी अशा मजकूरच्या पुस्तिका छापून वितरित करणे, भित्तिपत्रकामधून असंतोषाचा संदेश पोहोचविणे आणि देशभरातील क्रांतिकारी चळवळींचे संघटन केंद्र म्हणून जुम्मादादांचा आखाडा प्रसिद्ध होऊ लागला. माणिकराव हे महाराजा सयाजीराव आणि देशभरातील क्रांतिकारी चळवळीतल्या लोकांमधील विश्वासू दुवा म्हणून काम करू लागले. माणिकराव स्वातंत्र्यपूर्व काळात शिवजयंती, गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करत होते. आखाड्यात सावरकर, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांची व्याख्याने आयोजित करून प्रबोधनातून समाजजागृती आणि परिवर्तनाचे काम माणिकराव करत.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २८