पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इ.स. १८९७-९८ मध्ये प्रसिद्ध गवई मौलाबक्ष यांचे चिरंजीव डॉक्टर अल्लाउद्दीन यांना पाश्चिमात्य संगीतशास्त्राची माहिती करून घेण्यासाठी महाराजा सयाजीरावांनी विलायतेस पाठविले. ते तेथून सदर शास्त्राचा अभ्यास करून आल्यावर त्यांची कलावंत खात्यावरील मुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कलावंत खात्यास स्वतंत्र विभाग असे पूर्ण स्वरूप इ. स. १९०० मध्ये प्राप्त झाले. हा स्वतंत्र विभाग १९१२-१३ पर्यंत चालू होता. इ.स. १९१८-१९ मध्ये डायरेक्टर ऑफ म्युझिक त्याच वर्षाअखेर भारतीय संगीत शाळेचे प्रिन्सिपॉल यांच्या ताब्यात दिला गेला. या विभागाची सगळी कागदपत्रे स्वतंत्र रीतीने हुजूर हुकुमाप्रमाणे ठेवण्यात आली होती.

 ज्ञानासारखे पवित्र आणि शक्तिमान दुसरे काही नाही. राजाचा मोक्ष जनकल्याणात असतो; तसेच धर्माने गरिबांचा कैवारी बनावे. परिवर्तनशील जगात धर्मांचे स्थान आहे. हे मानणाऱ्या महाराजा सयाजीरावांना माणसांची आणि उत्तम गुणांची पारख होती. त्यामुळे देशभरातील उत्तम प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, कलावंत, साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार, नाटककार, छायाचित्रकार, चित्रपट निर्माते, भाषातज्ज्ञ, क्रांतिकारक, विचारवंत बडोद्यात जमा झाले होते. त्यातून जगप्रसिध्द नाटककार बालगंधर्व, महान चित्रकार राजा रवी वर्मा, संगीतकार अब्दुल करीम खाँ, अब्दुल हक़, चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, इटालियन मूर्तिकार फेलिसी, फॅटमन, महान

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / ८