पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सुमारास बडोद्याचे रावसाहेब शिरगावकर मुंबईस आले. त्यावेळेस त्यांना भेटून बडोद्याच्या राजाश्रयाचे प्रयत्न सर्वांनी सुरू केले होते. हे काम प्रसिध्द हार्मोनियम वादक गोविंदराव टेंभे यांनी सुरू केले होते. त्यांनी कंपनीतील घटकांची, कंपनीच्या उत्पादनाची व एका महिन्यात मिळालेल्या लोकप्रियतेची शिरगावकरांना माहिती दिली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खाडीलकर, देवल, साठे इत्यादी बड्या प्रस्थांचा पाठिंबा व बोर्डातील मंडळींची नावे इ. गोष्टींमुळे ही गंधर्व कंपनी जरी नवी असली तरी राजाश्रयाला सर्वस्वी योग्य आहे; अशी त्यांची खात्री पटवली.
बडोद्याच्या राजाश्रयासाठी प्रयत्न
 रावसाहेब शिरगावकरांनी श्री. सयाजी महाराजांजवळ गंधर्व कंपनीची शिफारस केली आणि महाराजांनी संमती दिली; पण त्यापूर्वी त्रिवर्ग भागीदारांना भेटीस बोलावले. महाराज काही कामानिमित्त मुंबईस आले होते व नेपिअन सी वरील 'जयमहाल' पॅलेसमध्ये त्यांनी बालगंधर्व व सर्व भागीदारांची भेट घेतली. सर्वजण महाराजांच्या भेटीला उंची वस्त्र, फेटे घालून गेले होते. दरबार हॉलमध्ये ठरल्याप्रमाणे सर्वजण हजर झाले.

 महाराज दरबार हॉलमध्ये आले. ते खूप घाईत होते त्यामुळे घाईघाईतच बोलले. महाराज म्हणाले, " शिरगावकरांनी मला तुमच्याविषयीची सर्व माहिती दिली, ठीक आहे; पण, एक गोष्ट आपणही लक्षात ठेवा की राजेलोकांप्रमाणे नाटकांचा आम्हाला नाद लागला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आश्रय देत आहे;

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / ११