पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रयोगशाळांपेक्षा सुसज्ज होती. या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक आणि प्रयोग करण्यासाठी आवश्यक सर्व साधने आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याने युक्त विद्यार्थ्यांसाठीची विशेष प्रयोगशाळा या विभागात सुरू करण्यात आली.
सयाजीज्ञानमंजूषा
 या सर्व विभागांबरोबरच कलाभवनचे ग्रंथालय विज्ञान आणि उद्योगाशी निगडित इंग्रजी, गुजराथी आणि मराठी भाषेतील विविध पुस्तके आणि नियतकालिकांनी समृद्ध होते. विज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि संशोधकांची चरित्रेदेखील या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती. प्रत्येक विभागाशी संबंधित नवीन पुस्तके दरवर्षी खरेदी करून शिक्षक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात. विविध तांत्रिक व वैज्ञानिक विषयांची पुस्तके गुजराथी व मराठी अशा देशी भाषेतूनच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सयाजीरावांनी 'श्रीसयाजीज्ञानमंजूषा' ही शास्त्रीय ग्रंथमाला सुरू केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक अडचणी दूर होऊन प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान त्यांना सहजरीत्या घेता येऊ लागले. या मालेतील बाळाजी प्रभाकर मोडक यांच्या 'सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र' (१८९३) या ग्रंथामध्ये 'ध्वनीशास्त्र व प्रकाशशास्त्र' या दोन शास्त्रांचे वर्णन केले आहे. या दोन शास्त्रांवरील मूलभूत सिद्धांत असणारा हा

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / १७