पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपल्या खाजगी आणि राज्याच्या संपत्तीतून निखळ मानवतावादी दृष्टीकोनातून फक्त भारतातच नव्हे तर जगभर जनकल्याणाच्या कामाला महाराजांनी दिलेल्या भक्कम आर्थिक आधाराला जगाच्या इतिहासात तोड नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे १८९८ ते १९०० या दोन वर्षांतील दुष्काळ कामांचा खर्च एक कोटी रुपयांहून अधिक झाला होता. एवढी रक्कम उभारताना सयाजीरावांनी खानगी खात्यातूनसुद्धा आर्थिक मदत केली. दिवाणखाण्याच्या मुख्यप्रवेशद्वारी सोन्याचे दोन सिंह होते. ते वितळून सोने विकले. ती रक्कम दुष्काळी कामाकडे वळवली. भारतात अनेक कल्याणकारी राजे झाले. परंतु दातृत्वाची ही परिसीमा गाठणारे सयाजीराव एकटेच.

ज्ञान आणि संपत्तीचा दुर्मिळ संयोग

 राजा आणि ऐश्वर्य ही जणू जुळी भावंडेच होत. जगभर राजांचे राजवाडे, ऐश्वर्यातील जगणे आणि त्यांच्या संपत्तीचे किस्से आपण अनेकदा ऐकलेले असतात. परंतु महाराजांच्या ऐश्वर्याला असणारी भरघोस दातृत्वाची उदार किनार त्यांना इतर राजांपासून वेगळी करणारी आणि सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवणारी ठरते. या राजवाड्याच्या वैभवाच्या चर्चेबरोबर ती समजून घेणे आज फार गरजेचे आहे. कारण आज लोकशाहीत लोकप्रतिनिधी आपण देशाचे मालक आहोत या धुंदीत एखाद्या सम्राटालाही लाजवेल अशा थाटात वावरत आहेत. जनतेच्या सुख-दुःखाशी त्यांचे कोणतेच नाते नाही हे त्यांच्याकडे पाहिले तरी लक्षात येते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / २०