पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उंच उंच खिडक्यांना रंगीत काचा लावलेल्या असतात तशाच रंगीत काचा दरबार हॉलच्या पूर्वेकडील खिडक्यांवर देवांच्या तसबिरी पाहावयास मिळतात. यामध्ये यशोदाकृष्णाच्या दोन, रामपंचायतन व विष्णूपंचायतन अशा चार तसबिरी खास विलायतेहून तयार करून आणल्या होत्या. भव्य व प्रशस्त अशा मुख्य दरबारच्या दिवाणखान्यामध्ये एकही खांब नाही. लक्ष्मीविलास राजवाड्यातील वास्तुकलेचा हा अद्भुत नमुना आहे. याचबरोबर राजवाड्यामध्ये अजिंठा लेणींची छाप असणारा वीणा कक्ष उभारण्यात आला होता. दरबार हॉलच्या भिंतींना संगमरवरीसारखे गुळगुळीत प्लास्टर, राजवैभवास साजेसे मोझॅकचे काम, सोनेरी बर्खाने सुशोभित केलेले छतावरचे काम आणि राजा रवी वर्मांच्या पौराणिक रंगीत पेंटिंगमुळे दरबार हॉल भारतीय प्राचीन संस्कृतीच्या राजवैभवाने आकर्षित करतो.
सत्यशोधकांशी जिव्हाळा

 सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत सत्यशोधक चळवळीला खंबीर पाठबळ दिले. महाराजांचे सत्यशोधक चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे सत्यशोधक एक नामांकित कंत्राटदार होते. लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामाचे कंत्राट सयाजीरावांनी अय्यावारू यांना दिले होते. गुणवत्ता आणि विचारधारा हे दोन निकष महाराजांनी आपल्या कारकीर्दीच्या आरंभापासूनच जोपासल्याचा हा उत्तम पुरावा आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १६